Monday 5 March 2012

आउटसोर्सिंग

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ही 2009 साली केलेल्या निरिक्षणांप्रमाणे जगातली तिसर्यात क्रमांकाची कंपनी म्हणून गणली जाते. प्रत्येक घरात व ऑफिसमधल्या प्रत्येक टेबलावर, संगणक व त्यात या कंपनीची संगणक प्रणाली, असलीच पाहिजे हे या कंपनीने प्रथम ठरविलेले ध्येय होते. आपल्यापैकी बहुतांशी लोक वापरत असलेले विन्डोज हे सॉफ्टवेअर, तसेच ज्या सॉफ्टवेअरद्वारे मी हा लेख टंकलेखित करतो आहे ती मायक्रोसॉफ्ट वर्ड ही प्रणाली ही या कंपनीचीच उत्पादने आहेत. कोणताही संगणक अतिशय कार्यक्षमतेने चालावा यासाठी त्याच्या अंतर्गत प्रणालींचे कार्य उत्तम रितीने चालणे आवश्यकच असते. तेच कार्य विन्डोज ही प्रणाली आपल्या सर्वांच्या संगणकांच्या मध्ये करत असते. थोडक्यात सांगायचे तर संगणकांचे जग केवळ मायक्रोसॉफ्ट उत्पादनांवर चालते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये.




आज मी हे मायक्रोसॉफ्ट पुराण का चालू केले आहे? अशी शंका बर्या च जणांना येण्याची शक्यता आहे. पण त्याला कारण आहे आजच्या वर्तमानपत्रांमध्ये आलेली एक ठळक बातमी. ही बातमी सगळ्यांनी बघितली असेलच असे नाही. ही बातमी अशी आहे की ‘ मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने, भारतातील एक अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी ‘ इन्फोसिस ‘ ला एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची अंदाजे किंमत अमेरिकन डॉलर्स 100 मिलियन ( 500 कोटी रुपये) पेक्षाही जास्त असणार आहे.’ आणि सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे ही ऑर्डर आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे स्वत:चे जे संगणक, 104 देशातल्या 450 स्थानांच्यावर आहेत, त्या सर्व संगणकांना, आवश्यक अशा applications, devices, and databases या क्षेत्रातल्या माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवण्याबद्दल. या सेवा ‘इन्फोसिसने पुरवून, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जगभराचे कार्य सुलभ व सुरळीत रित्या चालू ठेवावे अशी मायक्रोसॉफ्ट कंपनीची अपेक्षा आहे.

या सेवांच्यात मायक्रोसॉफ्ट चालवत असलेल्या मदत केंद्राचे कार्य आवश्यक कार्यक्षमतेने चालू राहील या साठी आवश्यक तो पाठिंबा इन्फोसिस पुरवेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सेवा इन्फोसिसने पुरवल्यावर अशी अपेक्षा आहे की या सेवा स्वत: पुरवण्यासाठी मायक्रोसॉफ्टला जो खर्च येतो त्यात खूपच बचत होईल.


आहे की नाही गंमत. आपल्या सर्वांचे संगणक कार्यक्षमतेने व सुरळीत चालावे या साठी सर्व सेवा मायक्रोसॉफ्ट पुरवते. पण स्वत:च्या संगणकांसाठी मात्र या सेवा बाहेरून घेतल्या तर आपले खूप पैसे वाचतील यासाठी त्या सेवा हीच कंपनी बाहेरून घेणार आहे. अर्थात यात चुकीचे असे काहीच नाही. कोणतीही कंपनी आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल हे सतत बघत असते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या ऑर्डरचे काही नवल वाटायला नको.


आता ही कंपनी जगातली तिसर्याे क्रमांकाची कंपनी असो किंवा चार माणसे कामावर ठेवून छोट्या ऑर्डर पूर्ण करणारी खाजगी वैयक्तिक मालकीची संस्था असो. मूळ तत्व तर तेच राहते. अगदी अशा छोट्या संस्थाना सुद्धा विक्री कर, आय कर, या साठी सल्लागार असतातच. अगदी हिशोब लिहिण्याचे काम सुद्धा बर्यािच वेळा बाहेर दिले जाते. अलीकडे या काम बाहेर देण्याला आउटसोर्सिंग असे नाव आहे. अलीकडे सरकारी खात्यांमधे सुद्धा आउटसोर्सिंगचे खूळ प्रचंड आहे. मात्र तिथले कारण निराळे असावे. खात्याचे कर्मचारी काम करतच नसल्याने तिथे हे बहुदा करत असावेत असा माझा अंदाज आहे.


चाळीस वर्षांपूर्वी मी माझा व्यवसाय जेंव्हा चालू केला होता तेंव्हा सुरवातीस सर्व हिशोब मला तोंडपाठ असत. काही दिवसांनंतर हे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर मी प्रथम एक लेखनिक कामावर ठेवला. परंतु माझ्या असे लक्षात आले की त्याला दिवसात 1 तासभर सुद्धा काम नसे. त्यामुळे त्याला डच्चू देऊन मी हे काम एका चार्टर्ड अकाउंटंटला दिले. तो काम व्यवस्थित करत असे. पण मला जेंव्हा काही माहिती हवी असे तेंव्हा ती लगेच मिळत नसे. तसेच त्याचे डेबिट- क्रेडिट मला समजत नसे.

त्यामुळे काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. शेवटी मी एक संगणक व व त्यावर वापरता येईल व हिशोब आणि इतर आनुषंगिक गोष्टी त्यावरून कळतील अशी एक संगणक प्रणाली खरेदी केली. ही प्रणाली वापरण्यास सोपी असल्याने एक लेखनिक रोज तासभर माझ्याकडे येऊन त्यात नोंदी करत असे. हा लेखनिक 1 तासच येत असल्याने त्याच्यावरचा माझा खर्च साहजिकच एकदम कमी झाला. इतर कोणत्याही वेळी मला कोणतीही माहिती हवी असली तरी मला ती एक क्षणात संगणकामुळे मिळत असे. माझ्यासारखे अनेक छोटे व्यावसायिक संगणक आज सामान्यपणे वापरताना दिसतात. आपल्या धंद्यावरचे आपले नियंत्रण या संगणक प्रणालींमुळे उत्तम राहते यात शंकाच नाही.


पन्नास शंभर वर्षांपूर्वी जे कारखाने चालत त्यात उत्पादनास आवश्यक असे सर्व सुटे भाग मूळ रॉ मटेरियलपासून त्या कारखान्यातच बनत. ते सुटे भाग बाहेरून करून घेतले तर धंद्यातील आपले आराखडे बाहेरचे लोक चोरतील अशी एक भिती उद्योगधंद्यांना वाटत असली पाहिजे. परंतु असे होण्यापासून कायदेशीर मार्ग अवलंबता येतात हे लक्षात आल्यानंतर कारखान्यांनी सुट्या भागांचे आउटसोर्सिंग मोठ्या प्रमाणात चालू केले. 1960 किंवा 70 च्या दशकात प्रत्येक मोठ्या कारखान्याभोवती अशा छोट्या छोट्या वर्कशॉप्सचे जाळेच निर्माण झालेले असे. पुढे या छोट्या वर्कशॉप्समधल्या सुट्या भागांची गुणवत्ता आवश्यक ती आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीच या मोठ्या कारखान्यांना खूप खर्च येऊ लागला त्यामुळे मोजकेच सप्लायर्स ठेवायचे व गुणवत्ता राखण्याचे काम त्यांच्यावरच सोपवायचे अशी कल्पना रूढ झाली व आजमितीला तीच प्रचलित आहे.

पुरवठादार असंख्य असोत किंवा मोजकेच आउटसोर्सिंगचे तत्व तेच राहिले. त्यात काही बदल झाला नाही. आता तर या आउटसोर्सिंगवर देश किंवा कालाचेही बंधन राहिलेले नाही. दुसर्याझ देशामधे जिथे लेबर चार्जेस कमी आहेत तिथे आपल्या उत्पादनाचे सुटे भाग आउटसोर्स करण्यास कंपन्या अजिबात मागे पुढे पहात नाहीत.

मोठे उद्योगधंदे, कार्यालये यांना इतरही अनेक सेवा लागतात. उदाहरणार्थ कॅंटीन, स्वच्छता कर्मचारी वगैरे. प्रथम या उद्योगांकडे स्वत:चे कर्मचारी असत. यावर उत्पादनास अनावश्यक खर्च फार होतो हे लक्षात आल्यावर या सेवा पण आउटसोर्स कराव्या अशी कल्पना निघाली. आज सर्व मोठ्या उद्योगांच्यात या सर्व सेवा बाहेरच्या ठेकेदारांमार्फत पुरवल्या जातात.

आज प्रत्येक उद्योग किंवा मोबाईल फोन सारख्या अनेक सेवा पुरवणारे यांना प्रचंड स्पर्धा सतत जाणवत असते. या स्पर्धेत टिकून रहायचे असले तर खर्च कमी करणे आवश्यकच बनते. आउटसोर्सिंग हा खर्च कमी करण्याचा अगदी रामबाण उपाय असल्याने तो जगभर अतिशय लोकप्रिय होत चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष कितीही कडक विधाने प्रत्यक्षात करोत. जोपर्यंत आउटसोर्सिंग करून आपला फायदा वाढणार आहे हे अमेरिकन कंपन्यांना दिसते आहे तोपर्यंत आउटसोर्सिंग चालूच रहाणार यात मला तरी शंका वाटत नाही.