Saturday 17 March 2012

आय्‌-सॅल्यूट--स्टीव्ह जॉब्ज !


वेस्ट इंडीजला असताना एक भारी विनोद प्रचारात होता. तो असा की "ऍडम ऍंड ईव्ह" ही जुन्या काळातली लैंगिकता झाली. आज पुढारलेल्या काळात ती आहे: "ऍडम ऍंड स्टीव्ह !" तर स्टीव्ह नावाचा परिचय मला असा झाला होता. स्टीव्ह नाव असलेल्यातला एकमेवाद्वितीय असलेला माणूस म्हणजे ऍपल कंपनीचा संस्थापक असलेला व आता पंचमहाभूतात विलीन झालेला हा  स्टीव्ह जॉब्ज !
      सध्या अमेरिकेला जेव्हढी तूट आहे तेव्हढी रोख रक्कम ह्या स्टीव्ह जॉब्जच्या ऍपल कंपनीकडे शिल्लक आहे, ह्यावरूनच त्याच्या यशाचे मोजमाप कोणीही करावे. आणि हे सुद्धा ह्या पार्श्वभूमीवर की दहा वर्षांपूर्वी ह्याच कंपनीने ह्याला चक्क काढून टाकले होते. आणि हा एकेकाळी भारतीय मंदीरात फुकटचे मिळते म्हणून जेवण घेत असे. माणूस किती मोहक असावा ! एव्हढ्या यशाच्या शिखरावर असून स्वत: अगदी अलिप्त राहणारा. व्हेजिटेरियन असून फक्त मासे खाणारा, बीटल्सचा इतका जबरदस्त फॅन की आपल्या कंपनीचे नावही त्याने बीटल्सच्या ऍपल-रेकॉर्डस्‌ वरूनच ठेवले होते व त्यावरचा वाद त्याने शेवटी २००७ साली तडजोडीने मिटवला होता. कॅंसरशी एकाकी झुंज देणारा. लीव्हर ट्रान्सप्लॅंट करून पॅंक्रीयसच्या कॅंसरशी टक्कर देणारा. कॅंसरच्या उपचारासाठी कंपनीतून दोनदा सहा सहा महिन्यांची रजा घेणारा. आणि तरीही त्या दरम्यान आय-फोर हा क्रांतीकारी फोन बाजारात आणणारा. आजही एक जीन व काळे टी शर्ट असा साधा पोषाख एक फॅशन म्हणून संगणक जगात रूढ करणारा. आई-बापांनी दत्तक घेतलेला एक मुलगा इतका प्रसिद्ध व्हावा ह्यात काहीतरी देवाचे संदेश आहेत असे वाटावे.(आपण दत्तक घेतलेलो आहोत हे सुद्धा त्याला त्याच्या वयाच्या २७व्या वर्षी कळते ह्यात सुद्धा मोठे नाट्य आहे. त्याचे खरे आई-बाप जोएन कॅरोल शीबल व अब्दुलफताह जन्दाली होते व त्यांनी ह्याच्या सारखीच अजून एक मुलगीही दत्तक दिली होती, जिने पुढे "द सिंप्सन्स" नावाच्या कार्टून मालिकेच्या प्रोड्यूसर रिचर्ड ऍपल ह्याच्याशी लग्न केले हाही मोठा योगायोग आहे.). त्याच्या जीवनातले नाट्य वाढते जेव्हा आपल्याला समजते की वयाच्या २३व्या वर्षी त्याला लिसा नावाची मुलगी होते, तिला तो प्रथम नाकारतो व नंतर स्वीकारत एका संगणकाचे नावही तो लिसा ठेवतो. स्टॅन्फोर्ड विद्यापीठात भाषणाला गेला असता तिथल्या एका मुलीशी लग्न करतो. ह्याची उत्पादने किती खपावीत ? अमेरिकेत सकाळीच लोक ह्याच्या दुकानांसमोर रांगा लावतात व नऊ दहा वाजेपर्यंत माल संपला म्हणून त्यांना सांगावे लागते. यश मिळावे तरी किती अजून, इतके हे प्रचंड यश आहे.

      ह्याचे पोर्टलॅंडच्या रीड कॉलेज मध्ये शिक्षण अर्धवट टाकून कंपनी सुरू करणे असेच मोहक आहे. त्याला डिसलेक्शिया असणे, तिसरीत असताना वर्गात साप व बॉम्ब सोडणेतरुण असताना ड्रग्ज घेतलेले असणे, व भारतात येऊन झेन बुद्धीझम स्वीकारणे ह्या त्याच्या आयुष्यातल्या घटनात किती तरी नाट्य भरलेले आहे. आज अमेरिकेत ऍपल कंपनीचे संगणक तरुणात फारच लोकप्रिय आहेत इतके ते वापरायला सोपे आहेत. ह्याचा आवडता विषय होता : कॅलिग्राफी. म्हणजे सुलेखन किंवा आपले अच्युत पालव जे अक्षरांचे निरनिराळे प्रकार करतात त्याचे शास्त्र. ह्याचे सगळेच और आहे.

      माझा मुलगा एका संगणक कंपनीत डायरेक्टर असून स्वत: प्रोग्रॅम करतो. त्याला मी एकदा सहज विचारले होते की स्टीव्ह जॉब्ज हा बिल गेटस्‌ पेक्षा ज्यास्त हुशार समजायचा का ? कारण आज इतकी वर्षे झाली बिल गेटस्‌ ची ऑपरेटींग सिस्टीम अजून रोज वाढत्या क्रमाने लोकप्रिय होतच आहे. संगणक क्षेत्रात कुठलीही बाब एक दोन वर्षापेक्षा मंजधारेत रहात नाही आणि ह्याची इतकी वर्षे टिकलीय म्हणजे हाच श्रेष्ठ विद्वत्तेचा असा माझा समज. तर त्याच्याशी तुलना करता आता स्टीव्हचाच पहिला नंबर आपण काढू. ह्यावर कंपन्यांचे काम करणे कसे असते हे जवळून पहात असलेला माझा मुलगा म्हणाला: आजकाल एका माणसाच्या विचाराने एखादे उत्पादन, कल्पनेपासून प्रत्यक्ष उत्पादन व ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत प्रभावित होईल हे खूप अशक्य आहे. उत्पादने इतकी गुंतागुंतीची झालेली आहेत की त्यांना प्रत्यक्षात काम करायला हजारो हुशार माणसांचे योगदान लागते व ते ज्या कंपनीला जेव्हा जमते तेव्हाच त्यांना यश लाभते. म्हणजे ऍपलच्या यशात एकट्या स्टीव्ह जॉब्जचा वाटा किती व त्याच्या हुशार इंजिनियरांचा किती, कंपनीच्या एकूण कारभाराचा वाटा किती हे सखोल संशोधनाचेच काम आहे असे समजायचे. कंपनी स्थापन करताना तो किती साधारण माणसासारखा होता, हे त्याचे त्याच्या सह-संस्थापकाशी झालेल्या भांडणावरनं दिसून येते. त्याच्या सह-संस्थापकाने ( स्टीव्ह वोझनिएक ह्याने, स्वत:साठी "कर्मचारी नं:१" चा बिल्ला बनवला होता व स्टीव्ह जॉब्जसाठी "कर्मचारी नं:२". त्यावर भांडण होऊन त्याने स्वत:साठी "कर्मचारी नं:०" चा बिल्ला करून घेतला तेव्हाच त्याला समाधान लाभले. ह्यावरून तो स्वत:ला किती वर समजत होता ती महत्वाकांक्षा सहजी दिसून येते . त्याच्यानंतर त्याचा उत्तराधिकारी असलेला टिम कुक हा माणूस मोठा तंत्रज्ञ असला तरी त्याचे गे असणे हेही मोठे जगावेगळे असून ते त्याच्या कामाआड येत नाही हे सुद्धा अमेरिकेची संस्कृती दाखवणारे आहे. माणसे येतात व जातात पण कंपन्या ह्या चालूच असतात. त्या जणु जगन्नाथाच्या रथासारख्याच असतात. कोणी ओढा वा न ओढा त्या त्यांच्या चालीने पुढे रेटतच असतात. कदाचित जॉब्ज इतका उत्साह नसेल तर एखादेवेळेस नवीन उत्पादने त्या धडाडीने येणार नाहीतही, पण कोणी सांगावे दुसरे काही क्रांतीकारक उत्पादन येईलही. 
    
      जगात आत्तापर्यंत तीनच सफरचंदे प्रसिद्ध होती. एक ऍडमने ईव्हला दिलेले, दुसरे न्यूटनने पडताना पाहिलेले, व एक रोज खाल्ल्याने डॉक्टरांना दूर ठेवणारे. आता हे चौथे सफरचंद ( ऍपल ), स्टीव्ह जॉब्जचे, येणारी कित्येक वर्षे अधिराज्य गाजवणार आहे.

तो जसा ह्या ऍपलने अजरामर होतोय, तसाच त्याच्या स्मरणाने त्या संस्थापकची जिद्द, चिकाटी आणि हुशारी अजरामर राहो हेच आहे "आय्‌-सॅल्यूट"!

                                        निशिकांत मानुगडे       
                               









भारत बनविणार महासुपर संगणक


भारताने पुन्हा संगणक क्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. भविष्यात भारत जगावर राज्य करेल, असे भाकीत करण्यात आले आहे. त्याला आता काहीप्रमाणात यश येत आहे. संगणक क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल पडले आहे. आता तर सुपर कम्प्युटरच्या कैक पटीने मजल मारणारा महासुपर संगणक (‘एक्झाफ्लॉप’ ) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील माहिती-तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.

पुण्यातील ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काही वर्षांपूर्वी  सुपर कम्प्युटर तयार केला होता. आता तर आणखी एक पाऊल टाकून महासुपर संगणक बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. हा महासुपर संगणक एका सेकंदात एकावर १८ शून्य इतकी प्रचंड गणिती प्रक्रिया करू शकणार आहे.

डॉ. विजय भटकर यांनी गेल्या वर्षी या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. राष्ट्रीय सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले. पुण्यातील सी-डॅक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या पुढाकाराने, तसेच देशभरातील विविध नावाजलेली विद्यापिठ, प्रयोगशाळा यांच्या सहयोगाने हे संशोधन केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली आहे,  हा महासुपर संगणक २0१८ पर्यंत तो बनविण्याचे लक्ष भारताने ठेवले आहे.

उच्चतम दर्जाचे सुपर कम्प्युटर बनविण्यासाठी स्पर्धा जगभरात सुरू आहे. अमेरिका, जपान, चीन व युरोप ही राष्ट्रे सध्या या स्पर्धेत आहेत. सध्या एका सेकंदात एकावर १५ शून्य इतक्या वेगाने गणिती प्रक्रिया करणारे टेटाफ्लॉप सुपर कम्प्युटर बनविण्यात यश आले आहे. त्याच्यापेक्षा १ हजार कोटींनी हा कम्प्युटर पुढे असेल, अशी माहिती डॉ. विजय भटकर यांनी दिली.

२0१0मध्ये चीनने सुपर पॉवर कम्प्युटर तयार केला आहे. त्यामुळे भारताची २००७पर्यंत जी आघाजी होती तिला धक्का पोहचला. आता चीनला मागे टाकण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. १९९८ मध्ये भारताने स्वबळावर परमसंगणक बनविला.  या परमसंगणकाची एका सेकंदात एक अब्ज गणिती प्रक्रिया करण्याची क्षमता होती. आता भारताने ज्या महासुपर कम्प्युटरसाठी कंबर कसली आहे, त्याची क्षमता याच्यापेक्षा १० लाख पट इतकी प्रचंड असेल, असे डॉ. भटकर यांनी स्पष्ट केले आहे.