संगणकाचे हार्ट म्हणून ओळखले जाणारे "हार्ड डिस्क' ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात शॉर्टेज झाले. यामुळे ऍसेंबल्ड संगणक विक्री करणाऱ्यांना हंगामातच झळ पोचली. ब्रॅण्डेड संगणकाला मागणी वाढावी यासाठी ही पॉलिसी असल्याचे बोलले जात असले, तरीही प्रत्यक्षात थायलंडमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा परिणाम असल्याचे जाणकार सांगतात.
शंभर-सव्वाशे उपव्यावसायिक हार्डवेअरच्या व्यवसायात आहेत. त्यांच्याकडूनच ऍसेंबल्ड संगणक तयार होतात. सुटे भाग विक्रीसाठी साधारण जिल्हा त्यांच्यावर अवलंबून आहे. हार्डवेअरचा व्यवसाय करणारे स्वतःची गुंतवणूक न करता बुकिंगवरच हार्ड डिस्कसह इतर सुट्या भागांची मागणी करतात. त्यामुळे हार्ड डिस्क शॉर्टेज झालेल्याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. बुकिंग घेतल्याने आता दरवाढीचे कारण सांगता येत नाही आणि हार्ड डिस्क जादा दराने खरेदी करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ग्राहक आणि त्यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. जे प्रमुख विक्रेते आहेत त्यांनी ग्राहकांना (मदरबोर्डसह अन्य भागांचा सेट खरेदी करणाऱ्यांना) हार्ड डिस्क दिल्या आहेत. परिणामी ऍसेंबल्ड संगणक तयार करणाऱ्यांना झळ बसली.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मार्केटमध्ये केवळ ब्रॅण्डेड संगणकच विक्री केले जावेत, यासाठी हार्ड डिस्कचे शॉर्टेज केल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेषतः हा फुगवटा दिवाळीपुरता मर्यादित असून आणखी महिन्याभरात पुन्हा हार्ड डिस्क मिळू शकतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे; तर थायलंड-मलेशिया या भागात हार्ड डिस्क तयार करणाऱ्या फॅक्टरीज आहेत. तेथे महापूर असल्यामुळे तेथील फॅक्टरी बंद आहेत; तसेच डॉलरचा दर वाढत असल्यामुळेही हार्ड डिस्क मार्केटमध्ये उपलब्ध होत नसल्याचेही सांगण्यात येते. कारण काहीही असो मात्र ऐन दिवाळी पाडव्याच्या सनात ऍसेंबल्ड संगणक तयार करणाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला हे नक्कीच.
""सध्या बाजारात हार्ड डिस्कचे दर दुपटीने वाढले आहेत. आठवड्यापूर्वी पाचशे जीबी हार्ड डिस्क दोन हजारला मिळत होती ती आता चार हजारला विकली जात आहे. दिवाळी-पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ती शॉर्टेज झाल्यामुळे ब्रॅण्डेड कंपन्यांकडून ही बिझनेस पॉलिसी असल्याचे बोलले जात असले तरीही प्रत्यक्षात तसे काहीच नाही. थायलंड-मलेशियात महापूर आल्यामुळे आणि डॉलरच्या किमती वाढत असल्यामुळे हा परिणाम झाला आहे.
हार्ड डिस्क नसली तरी चालेल...
संगणकात हार्ड डिस्क नसली तरीही स्टोअरेज कपॅसिटी करण्यासाठी काही ठिकाणी सर्च इंजिनचा उपयोग केला जाऊ शकतो. डाटा ई-मेलवरसुद्धा
साठवून ठेवता येतो. यासाठी स्वतंत्र पासवर्ड असल्यामुळे तो इतर कोणालाही मिळणार नाही, याची खात्रीही असते. मात्र संगणकातून हार्ड डिस्क सध्या तरी कालबाह्य होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.