Saturday, 29 September 2012

युएसबी संगणक खिशात घालून खुशाल फिरा!


लंडन - यूएसबी स्टीकमध्ये तुमचा वैयक्तिक संगणक खुशाल खिशात घेऊन जा, गरज पडली की अन्य कोणत्याही संगणकावर त्याचा वापर करा. तुम्ही खिशात आणलेला संगणक वापरत आहात याचा थांगपत्ता कुणालाही लागणार नाही, असे जेम्स बॉँडलाही भूरळ घालणारे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

एका साध्या यूएसबी मेमरी स्टीकमध्ये विंडोजसारखी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टिम आहे. गरज पडली की ही यूएसबी स्टीक कोणत्याही संगणकाला प्लग करायची. तो संगणक लगेच तुमच्या वैयक्तिक सेटअपमध्ये रिस्टार्ट होईल आणि तुम्हाला तुमचा वैयक्तिक संगणक पूर्ण क्षमतेने वापरता येईल.

या तंत्रज्ञानाला ‘टेल’ असे संबोधण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ज्या पीसीवर तुम्ही तुमचा संगणक ऑपरेट केला, त्या पीसीवर तुमची ब्राऊसिंग हिस्ट्री किंवा अन्य कोणत्याही बाबीच्या किंचितही पाऊलखुणा मागे राहाणार नाहीत. तुमचे काम संपले की तो संगणक शट डाऊन करा. यूएसबी स्टीक तुमच्या खिशात घाला. तुम्ही तुमचा पीसी तेथे ऑपरेट केला हे त्या संगणकाला अजिबात ट्रेस करता येणार नाही.



तंत्रज्ञान चांगले पण - ही यूएसबी स्टीक संगणकाला जोडल्यानंतर तुम्ही जे काही करता ते सगळे काही टेलमध्येच होते. म्हणजे तुम्ही ब्राऊज केलेल्या वेबसाइटच्या कुकीज किंवा रिसायकल बिनमध्ये तुमचा एखादा डॉक्यूमेंट शिल्लक राहाण्याची सुतरामही शक्यता नाही. हे नवे तंत्रज्ञान चांगले असले तरी यूएसबी स्टीकद्वारे अत्यंत गुप्तपणे काम करता येणार असल्याने लोकांना बेकायदेशीर कारवाया करणे सुलभ होणार असल्याची टीका संगणक सुरक्षातज्ज्ञ करू लागले आहेत.

सुरक्षेची हमी पण हरवण्याची भीती - टेलमुळे तुमचे डॉक्यूमेंट कोणालाही चेक करता येणार नाही. तुमचा पीसी सुरू असला किंवा तुमच्या खिशात ठेवलेला असला तरी त्याच्या हालचालींवर कोणालाही पाळत ठेवता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुरक्षेची हमी मिळते. असे असले तरी ही यूएसबी मेमरी स्टीक हरवणार नाही, एवढीच दक्षता तुम्हाला घ्यावी लागणार आहे.