Tuesday, 27 March 2012

आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची आहे

आपल्याला संगणकावरील एखादी फाईल काढून टाकायची असते. आपण ती Delete करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला यश येत नसतं. खाली दाखवल्याप्रमाणे काहीतरी विचित्र संदेश संगणक देत असतो आणि ती फाईल पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही डिलीट होत नसते. ते संदेश साधारणतः असेः


Cannot delete file: Access is denied

There has been a sharing violation.

The source or destination file may be in use.

The file is in use by another program or user.

Make sure the disk is not full or write-protected and that the file is not currently in use.

ह्यापैकी एखादा वा तत्सम संदेश पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असतं की मला जी फाईल डिलीट करायची आहे ती ना मी कुठे उघडली आहे, ना ती कोणत्याही प्रोग्रामसाठी वापरात आहे. असं असूनही ' The file is in use by another program or user' हा संदेश का येतोय. चक्रावल्यामुळे पुढे आपल्याला यामागे एखाद्या व्हायरसचा किंवा स्पायवेअरचा तर हात नसेल ना असा संशयही येऊ लागतो.
ह्या परिस्थितीतून सुटण्यासाठी अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर म्हणजे Unlocker. सध्या त्याचे १.८. ८ हे व्हर्जन उपलब्ध आहे. हा प्रोग्राम अधिकृतरित्या मोफत म्हणजेFreeware आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी हा घ्या पत्ताः
http://www.filehippo.com/download_unlocker/
खूप जणांना ती सापडत नाही. त्यामुळे खालील चित्रात ती नेमकी बाणाने दाखवली आहे.)



आपला पेन ड्राईव्ह बाहेर काढतानाही बरेच वेळा पेन ड्राईव्ह मधल्या काही फाईल्स वापरात असल्याने तो काढणं Safe नाही
अशा प्रकारचे संदेशही वारंवार येत असतात. त्यातला एक संदेश खालील विंडोत दाखवला आहे.



अशा वेळी पेन ड्राईव्हच्या रूट फोल्डरवर वा ड्राईव्ह लेटरवर राईट क्लीक करून Unlocker ला त्या फाईल्स मोकळ्या करायला सांगितल्यास आपली समस्या सुटते.राईटक्लीक करण्याचा Unlocker चा नेमका मेनू आयटेम खाली दाखवला आहे. 



वर जो Unlocker डाऊनलोडचा पत्ता दिला आहे तो पाहिल्यावर ही साईट फ्रान्समधील आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या मदतीसाठी सारं संगणकीय जग कसं प्रयत्नशील असतं त्याचच हे एक उदाहरण.

नेटवर थेट अल्बम

     www.jalbum.net 
                                                 इतरांचे फोटो काढणं, काढलेले फोटो पहात बसणं, आपले फोटोही इतरांकडून काढून घेणं आणि ते आणखी इतरांना पहायला लावणं ही एकविसाव्या शतकातल्या माणसाची भूक आहे. ही भूक पूर्वी नव्हती असं नाही. पण फोटो ही चीज सामान्यतः लग्ना-मुंजीत आणि पुढे वाढदिवसांपुरती साधारणतः मर्यादित असायची. कॅमेरा ही घरोघर असणारी चीज तेव्हा नव्हती.

फोटो काढायचे म्हणजे महागडा रोल आणायचा, फोटो काढायचे, फिल्म धुवायची (धुलाईच सगळी!), मग पोस्टकार्ड साईज प्रिंट मारून घ्यायच्या असा सारा व्याप. हौसेची बॅटरी फुल्ल चार्ज असल्याशिवाय आणि खिशाला चांगली ऊब असल्याशिवाय हे फोटो प्रकरण जमणं पूर्वी एकूण अवघड असायचं. साधा क्लीक कॅमेरा खरेदीला स्वस्त असला तरी मनासारखे स्वच्छ फोटो येत नसल्याने कोणी तो गळ्यात बांधून सर्रास फिरायचे नाहीत. महागड्या कॅमेर्‍यात फोटो छान येत असले तरी तेवढी गुंतवणूक हौसेसाठी केवळ करणारे अगदी थोडेच असायचे.

आता काळ बदलला आहे. ह्या एकविसाव्या शतकात अगदी गावागावात सुद्धा बर्‍याच घराघरातून डिजिटल कॅमेरा दिसू लागला आहे. शहरात तर तो जवळजवळ घराघरात आला आहे. शिवाय मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यातूनही रोजच्या रोज शेकडो डिजिटल फोटो संगणकात जाताहेत आणि ईमेलने ते जगभर कुठेही पोहोचत आहेत. एकीकडे डिजिटल कॅमेरा अक्षरशः आश्चर्य वाटावं एवढ्या कमी किंमतीला उपलब्ध झाला आहे. तर, दुसरीकडे ब्रॉडबँड इंटरनेट गल्लीगल्लीत पोहोचतं आहे. हा तांत्रिक विकास होत असताना दुसरीकडे घरातली हुशार मुलं शिकून सवरून अमेरिका, इंग्लंड, जपान आणि कुठेकुठे जाऊ लागली आहेत.

मग, परदेशात गेलेल्या मुलांशी भारतातल्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी इंटरनेटवर शब्दांचा चॅट, वॉईस चॅट करत विरंगुळा साधणं रोजचं होऊन गेलं आहे. आजोबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाला, कॅलिफोर्नियात नोकरीसाठी गेलेला राहुल येणं तसं शक्यच नव्हतं. मग घरच्यांनी अतिशय हौसेनं त्याला त्या कार्यक्रमाचे फोटो मेल केले. असे प्रकार हे आता दैनंदिन जीवनातला एक भाग बनू लागला आहे.

पोस्टकार्डाच्या आकाराच्या फोटोंचा गुळगुळीत गठ्ठा गच्च पाकिटांतून आला की बावन पत्ते पिसून हातात आल्यासारखं वाटतं. तेच फोटो झकास अशा अल्बममधून आले की ते पाहताना मात्र छान वाटतं. ईमेलला फोटोंची मालिका अॅटॅच करून पाठवणं हे पाकिटातून फोटो आल्यासारखं आहे. पण तेच अल्बमच्या सॉफ्टवेअरमधून सुंदर व रंगीत पार्श्वभूमीच्या कोंदणात बसून आले की बघावेसे वाटतात. आपल्यापैकी बरेच जण इंटरनेट आणि डिजिटल कॅमेर्‍याशी चांगले परिचित असतात. पण ते सुंदर व आकर्षक अल्बमचं सॉफ्टवेअर कुठून आणायचं, संगणकावर ते कसं लावायचं याचं गणित काही त्यांना जमण्यासारखं नसतं. अशांसाठी इंटरनेटवर एक खूप चांगली सोय आहे. ही सोय आपल्याला www.jalbum.net वर पहायला आणि सहजपणे अनुभवायला मिळते. तुम्ही ती आजपर्यंत अनुभवली नसेल तर jalbum.net वर जरूर जा.

Jalbum.net वर तुम्हाला तुमच्या डिजिटल फोटोंचा अल्बम करून देणारं सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे हे सॉफ्टवेअर वापरणं हे अक्षरशः बाये हाथका खेल आहे. मोफत आणि अगदी सोप असं हे जाल्बम सॉफ्टवेअर jalbum.net वरून डाऊनलोड करून घ्या. काही क्षणात पटकन ते संगणकावर चढवा. तुमच्या डिजिटल कॅमेर्‍यातील फोटो जाल्बमच्या स्क्रीनवर फक्त आणून टाका (म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप), तयार अल्बमचं एक डिझाईन निवडा आणि Make Album ह्या बटणावर फक्त क्लीक करा. झाला तुमचा अल्बम तयार. हा अल्बम तुम्हाला ईमेलने पाठवता येतोच, पण त्याही पलिकडे म्हणजे तो तुम्हाला इंटरनेटवर ठेवता येतो. अर्थातच मोफत. खरं तर गुगलचं पिकासा किंवा याहू चं Flickr सारख्या फोटो शेअरींगच्या सोयी देणार्‍या इतर साईटस एव्हाना चांगल्या लोकप्रिय झालेल्या आहेत. पण तरीही मला jalbum.net चं अप्रुप वाटतं याचं कारण त्यातला साधेपणा आणि सोपेपणा. जगभरातल्या चाळीस लाख लोकांनी हे जाल्बम सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं आहे आणि आपले हजारो अल्बम जाल्बमच्या साईटवर मोफत ठेवले आहेत.

इंटरनेटवर तुमचा अल्बम ठराविक मंडळींनाच पाहता यावा यासाठी जाल्बमवर पासवर्ड लावण्याची सोयही उपलब्ध आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मराठी युनिकोड फाँटस असतील तर तुमच्या प्रत्येक फोटोला मराठी कॅप्शन देखील तुम्हाला देता येते. एखादा फोटो चुकून अंधुक आला असेल तर तो सुधारण्याची सोयही जाल्बमच्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. एखाद्या फोटोतला कडेचा किंवा वरचा वा खालचा नको असलेला भाग काढण्याची सोय (cropping) देखील जाल्बमने दिली आहे. फोटोवर संस्कार करणार्‍या Red eye, Levels, Gamma, Sharpen, Blur, Invert सारख्या सोयींसाठी आपल्याला फोटोशॉप सारखं महाग आणि वापरायला कठीण असं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. पण जाल्बमने ह्या सोयी तयार दिल्या आहेत. जाल्बमने तुम्हाला काय काय दिलय हे लक्षात घ्या. एक - तुमच्या फोटोंचा आकर्षक व रंगीत अल्बम तयार करून देणारं सॉफ्टवेअर तुम्हाला दिलं आहे. तुमच्या फोटोंवर संस्कार करण्याची तांत्रिक सोय त्यांनी दिली आहे. एखादा रंगीत फोटो कृष्ण-धवल करून हवा असेल तर ती सोयही जाल्बमने उपलब्ध केली आहे.


सामान्यतः इंटरनेटवर मोफत म्हंटलं की तिथे आपल्याला नको त्या जाहिराती हमखास टाकलेल्या असतात. पण जाल्बम त्याला अपवाद आहे. आपला अल्बम स्वच्छ व कोणत्याही जाहिरातींचं ठिगळ न लावता पाहण्याची सोय जाल्बम देतो. आता हे सगळं वाचल्यानंतर एक प्रश्न सर्वांनाच स्वाभाविकपणे पडतो की हे सारं मोफत मोफत कोणी कसं देऊ शकतं? ह्या मागचं अर्थशास्त्र नेमकं कसं असतं? जाल्बमचे आर्थिक व्यवस्थापन दोन प्रकारे होताना दिसतं. एक म्हणजे जाल्बम देणग्या स्वीकारतं. आपला सुंदर अल्बम आपल्याला वेबसाईटचा कसलाही खर्च न पडता इंटरनेटवर प्रकाशित झाला याच्या समाधानापोटी जाल्बमला हजारो डॉलर्सच्या देणग्या देणारे लोक जगभर आहेत. ज्या चाळीस लाख लोकांनी जाल्बम डाऊनलोड केला आहे
त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी कृतज्ञतेपोटी देणग्या दिल्या असतील तरी ती रक्कम उल्लेखनीय असू शकते. जाल्बम जरी आपल्या अल्बमवर जाहिराती टाकत नसला तरी त्यांच्या वेबसाईटवर इतरत्र जाहिराती स्वीकारण्याची सोय आहे. तो भागही जाल्बमची आर्थिक बाजू सांभाळणारा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या फोटो अल्बमसाठी जाल्बम आपल्याला कमाल ३० एम.बी. जागा देतो. खरं तर ही जागा एका छोट्या फोटो अल्बमसाठी पुरेशी होते. खेरीज आपण वेगवेगळ्या नावाने अनेक अल्बम्स देखील उघडू शकतो. पण ज्यांना शेकडो फोटोंसाठी ३० एम.बी. पेक्षा अधिक जागा लागणार आहे त्यांना ती जाल्बमकडून विकत घेता येते. ह्या तीन चाकांवर जाल्बमची आर्थिक गाडी चालत असते. जाल्बम आज जगातल्या एकूण ३२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. बत्तीसचा हा आकडाही आपल्याला त्याची लोकप्रियता लक्षात येण्यासाठी पुरेसा आहे.


जाल्बम तयार करून जगाला मोफत देणारी ही कंपनी आणि त्यामागची माणसं कोणं हे जाणण्याची उत्सुकता तुम्हा आम्हाला असणं स्वाभाविक आहे. जाल्बमच्या मागची बहुतेक मंडळी ही स्वीडनमधील स्टॉकहोम शहरातली आहेत.

त्यातले अनेक जण वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. डेव्हिड एखोम हा जाल्बमचा संस्थापक. बर्फाळ प्रदेशात स्काईंग करणं हा त्याचा छंद. स्काईंगची एक सहल संपवून आणि भरपूर फोटो काढून डेव्हिड घरी परत आला. काढलेले फोटो त्याला इंटरनेटवर टाकायचे होते. त्यासाठी तो फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधत होता. ही गोष्ट २००२ सालची, म्हणजे साडेपाच-सहा वर्षांपूर्वीची. डेव्हिडला फोटो अल्बम तयार देणारी वेब साईट शोधूनही सापडली नाही, तेव्हा त्यानेच तशी वेबसाईट तयार करण्याचा संकल्प केला, आणि तो तडीस नेला. त्यातूनच जाल्बम डॉट नेट तयार झाली. ज्यांना संगणकाची फक्त वरवर माहिती आहे व ज्यांना फार कष्ट न घेता आणि जास्त वेळ न घालवता स्वतःच्या फोटोंचा अप्रतिम अल्बम इंटरनेटवर प्रकाशित करायचा आहे त्यांचेसाठी जाल्बम म्हणजे एक उत्तम सोय आहे यात शंका नाही.

जुनी सॉफ्टवेअर्स इथे मिळतात...

                                                                                           

   http://www.oldapps.com


साईटच्या नावाप्रमाणेच इथे जुने प्रोग्राम्स आहेत. एकूण १८९ प्रोग्राम्सची २२६८ जुन्या आवृत्त्या इथे उपलब्ध आहेत. ह्या साईटचा समावेश इथे अशासाठी केला की ही चाकोरीबाहेरची साईट आहे. काही वेळा विद्यार्थ्यांना वा अभ्यासकांना जुने प्रोग्राम्स लागतात. ते इथे मिळण्याची शक्यता आहे.

Monday, 26 March 2012

हॅकर्सचा हल्लाबोल


हॅकर्सचा हल्लाबोल 'इंटरनेट' संपर्कासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमांपैकी एक प्रमुख माध्यम. इंटरनेटने जग जवळ आले. केवळ एका क्लिकवर घरबसल्या जगाच्या कानाकोपर्‍यातील कशाचीही माहिती मिळवता येते. जगात कुठेही आपल्या संदेश ई-मेलद्वारे क्षणार्धात पाठविता येतो. कोणतीही खासगी संस्था, सरकारी आस्थापना, कॉर्पोरेट कंपन्या यांची माहिती हवी तेव्हा त्यांच्या वेबसाईटवरून घेता येते. जग जोडणार्‍या या माध्यमाचे फायदे अनेक आहेत, पण त्यापेक्षा या माध्यमाचा गैरवापर करणार्‍यांची संख्या अधिक आहे.

 ज्याप्रमाणे एका क्लिकवर जगाची माहिती मिळवता येते त्याचप्रमाणे 'हॅकर्स' एका क्लिकवर तुमचा ई-मेल आयडी किंवा वेबसाईट हॅक करतात. 'हॅकर्स' हे संगणक क्षेत्रात उच्चशिक्षित असतात. केंद्र सरकारची े.ुदन्.ग्ह ही वेबसाईट नुकतीच हॅक करण्यात आली. यावर पाकिस्तानी चिथावणीखोर संदेश टाकण्यात आले. ही वेबसाईट कुणी आणि कशी हॅक केली याचा शोध सुरू आहे.
 काही दिवसांपूर्वी सीबीआयची वेबसाईटदेखील हॅक करण्यात आली होती. जवळपास महिनाभरानंतर ती पुन्हा सुरू झाली. वेबसाईट हॅक करण्याच्या घटना काही नवीन नाहीत. गेल्या पाच वर्षांत देशभरात

तब्बल ३६७ वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूमध्ये दरवर्षी हॅकिंगचे सर्वाधिक गुन्हे नोंद होतात. हॅकर्स एखादे सॉफ्टवेअर अथवा व्हायरसचा वापर करून वेबसाईट हॅक करतात. वेबसाईटवर संबंधित संस्था किंवा तिच्या पदाधिकार्‍यांची वैयक्तिक माहिती असते. या माहितीचा गैरवापर हॅकर्सद्वारे केला जाऊ शकतो. संस्थेच्या सर्व डेटा नष्ट करून तिचे नुकसान व्हावे या उद्देशानेदेखील वेबसाईट हॅक केल्या जातात. त्यामुळे वेबसाईटवर स्वत:ची किंवा संस्थेची इत्थंभूत माहिती देताना काळजी घेण्याची गरज आहे. वेबसाईटबरोबरच ई-मेल आयडीदेखील हॅक करण्यात हे हॅकर्स माहीर असतात.

अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा ई-मेल आयडी हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. अंबानी यांच्या संपर्कातील व्यक्ती, त्यांनी ई-मेलवरून पाठविलेली माहिती हे सर्व चोरी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले. याआधीदेखील अनेक कंपन्या आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांचे ई-मेल हॅक करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. एखादा नातेवाईक, मित्र किंवा कंपनीतील सहकारी अशा ओळखीच्या व्यक्तींच्या नावावर हॅकर्स ई-मेल आयडी उघडतात आणि त्याद्वारे ई-मेल पाठविला जातो. ओळखीचे नाव दिसल्याने आपणही कोणताही विचार न करता मेल उघडतो.

 या मेलमध्ये माहितीऐवजी एखाद्या हॅक करणारा सॉफ्टवेअर किंवा व्हायरस असतो. संगणक अचानक हँग झाल्यानंतर आपल्या लक्षात येते. हॅकर्सची आणखी एक मोडस् ऑपरेंडी आहे. 'तत्काळ मदतीची गरज' तुमजा मित्र परदेशात अडचणीत आहे. त्याचे पाकीट व इतर सामान चोरीला गेले असून घरी परतण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला मदत करण्यासाठी काही रक्कम दिलेल्या बँक खात्यात जमा करा' असा ई-मेल वाचून आपण संभ्रमात पडतो. नेमका त्याच वेळी मित्राशी संपर्क न झाल्यास आपणही त्यावर सहज विश्‍वास ठेवतो आणि मित्रासाठी काही रक्कम मेलमध्ये उल्लेख केलेल्या बँक खात्यात जमा करतो, पण प्रत्यक्षात मित्र हा परदेशात गेलेलाच नसतो त्यावेळी फसवणूक झाल्याचे आपल्या निदर्शनास येते.

 ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा ई-मेल देखील अशाचप्रकारे हॅक करण्यात आला होता. त्यामुळे ई-मेल हाताळताना जरा जपून. खासगी माहिती ई-मेलवर अथवा वेबसाईटवर ठेवू नका. तुमची एक चूक भविष्यात धोकादायक ठरू शकते. हॅकर्समुळे गेल्या दोन वर्षांत हिंदुस्थानला सुमारे एक हजार कोटींचा फटका बसला आहे.

आर्थिक नुकसानीची ही रक्कम आपण काळजी न घेतल्यास वाढू शकते. इतकेच नाही तर देशातील सरकारी संस्थांची माहिती मिळवून समाजकंटक या माहितीचा गैरवापर करू शकतात. ई-मेल उघडण्यापूर्वी हे तपासून पहा - ई-मेल ओळखीच्याच व्यक्तीने पाठविला आहे का? - याआधी त्या व्यक्तीने ई-मेल पाठविला होता का? - ई-मेल पाठविणारा सोबत 'अटॅचमेंट' पाठविणार होता का? - ई-मेलचा विषय आणि अटॅचमेंटचा विषय सारखाच आहे का? - व्हायरसचा धोका आहे का? (अपडेटेड ऍण्टी व्हायरसची गरज असते.) - व्हायरस ऍलर्टचा ई-मेल फॉरवर्ड करू नका. वेबसाईट व ई-मेल हॅक होऊ नये म्हणून.... - ई-मेल आयडीचा पासवर्ड वारंवार बदलावा. - नाव, टोपणनाव, मोबाईल क्रमांक ही सर्वसाधारण माहिती पासवर्डसाठी टाळा. - ऑनलाईन किंवा फोनवर पासवर्डची देवाणघेवाण करू नका. - ज्या माहितीमुळे नुकसान होईल अशी माहिती वेबसाईटवर टाकू नका. - ऍण्टी व्हायरस नियमित अपडेट करा. - मूळ सर्व्हरसाठी सॉफ्टवेअरची लायसन्स कॉपी वापरा

Saturday, 24 March 2012

मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश


मागे आपण इंग्रजी शब्दांचे अर्थ मराठीत पाहण्यासाठी किंवा मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत पाहण्यासाठी ‘गुगल शब्दकोश’ संदर्भात माहिती घेतली होती. पण मला वाटतं आता गुगलने आपला ‘गुगल शब्दकोश’ बंद केला असून, ‘गुगल ट्रांसलेट’ वर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. पण मराठी-इंग्रजी शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगलचा शब्दकोश हा ऐकमेव पर्याय नसून, यासंदर्भातील इतर काही उपयुक्त साईट्स नुकत्याच माझ्या पाहण्यात आल्या आहेत. त्या सर्व साईट्स आपण एक एक करुन आजच्या लेखात थोडक्यात पाहणार आहोत. इंटरनेटवर एखादा इंग्रजी मजकूर वाचत असताना, जर आपल्याला एखादा शब्द अडला किंवा इंग्रजी लिहित असताना मनातील एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ आपल्याला इंग्रजीमधून हवा असल्यास, आपल्याला  या ऑनलाईन मोफत शब्दकोशांचा उपयोग होऊ शकेल. तर आता आपण एक एक करुन या शब्दकोशांची माहिती घेऊयात.

१० मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी ऑनलाईन शब्दकोश


‘शब्दकोश.कॉम’ च्या मराठी विभागात आपण मराठी-इंग्रजी अर्थ समजून घेऊ शकतो. नोव्हेंबर २००३ सालापासून या साईटची सुरुवात झाली असून, ही साईट मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करते. साईटच्या उजव्या बाजूस वर आपल्याला एक सर्च बॉक्स दिसून येईल, त्यात मराठी किंवा इंग्रजी शब्द टाकून शोध घेतल्यास आपल्याला हवा असलेला शब्द प्राप्त होईल. आपल्याला जर मराठी टाईप करता येत नसेल, तर KEYBOARD ची व्यवस्था देखील करुन देण्यात आली आहे.


‘श्रीधर गणेश वझे’ यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश वर नमूद केलेल्या पत्यावर उपलब्ध आहे. ‘द आर्यभुषण स्कूल डिक्शनरी’ असे या शब्दकोशाचे नाव आहे. अधिक अचूक शोध घेण्यासाठी सर्च बॉक्स खाली दिलेल्या पर्यायांचा देखील विचार करावा.


‘अ डिक्शनरी, मराठी अँड इंग्लिश’ नावाचा ‘जे.टी.मोल्सवर्थ’ यांचा शब्दकोश आपल्याला वरील पत्यावर ऑनलाईन वापरता येईल. दिलेल्या रिकाम्या जागेत मराठी अथवा इंग्रजी शब्द लिहून शोध घेतल्यास आपल्याला हवा तो शब्द व अर्थ, हव्या त्या भाषेत प्राप्त होईल.


अ. dicts.info/dictionary.php?l1=English&l2=Marathi - इथून इंग्रजी शब्दांचा मराठी अनुवाद करता येईल.
ब. dicts.info/dictionary.php?l1=Marathi&l2=English - इथून मराठी शब्दांचा इंग्रजी अनुवाद करता येईल.


या इंग्लिश मराठी शब्दकोशाबाबत मला वाटतं अनेकांना आधिपासूनच माहित असेल. ‘खंडबहाले’ या शब्दकोशामागची पार्श्वभूमी आपल्याला या इथे वाचायला मिळेल. खंडबहालेचे मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे मोबाईल सॉफ्टवेअर देखील आहे, पण ते मोफत नसून त्यासाठी आपल्याला २०० रुपये द्यावे लागणार आहेत.


‘ई शब्दकोश’ आपल्याला इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ शोधण्यास सहाय्य करतो. पण हा शब्दकोश वापरुन आपल्याला एखाद्या इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत नीट दिसत नसल्यास, त्याबाबतची मदत या इथे उपलब्ध आहे.


‘मराठी डिक्शनरी’ हा देखील एक ऑनलाईन संपूर्ण मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश आहे. शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला या शब्दकोशाचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपण एक एक करुन शब्दांचे अर्थ जाणून घेऊ शकाल, अथवा शोध बॉक्सचा उपयोग करुन नेमक्या शब्दाचा अर्थ जाणून घेता येईल.


‘तमिळक्यूब’ या साईटवर आपल्यासाठी एक ऑनलाईन मराठी-इंग्रजी शब्दकोश उपलब्ध आहे. तिथल्या सर्च बॉक्सचा वापर करुन आपण आवश्यक त्या शब्दांचे अर्थ आपल्याला हव्या असलेल्या भाषेत मिळवू शकतो.


मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी शब्दकोश
इंडियन डिक्शनरी या इथे देखील एक अतिशय उत्तम असा इंग्रजी मराठी, मराठी-इंग्रजी शब्दकोश आहे. मेनू मधील DICTIONARIES हा टॅब उघडून आपण मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी असा शब्दकोशामध्ये बदल करु शकतो. दिलेल्या रिकाम्या जागेत शब्द टाकून आपण त्या शब्दाचा अर्थ प्रतिभाषेत शोधता येईल.


वरील पत्यावर आपल्याला ‘वेबस्टर’ चा ऑनलाईन मराठी शब्दकोश आढळून येईल. हाही एक समृद्ध असा शब्दकोश असून, या शब्दकोशाचा आपल्याला आपल्या कामात नक्कीच उपयोग होऊ शकेल.


ही काही ऑनलाईन मराठी शब्दकोशांची यादी होती. याव्यतिरीक्त ऑनलाईन मराठी शब्दकोशांचे काही दुवे जर आपल्याला माहित असतील, तर त्यांची माहिती आपण खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून देऊ शकाल. ही माहिती सर्व मराठी लोकांसाठी आवश्यक आणि उपयुक्त आहे.