Saturday, 28 January 2012

मराठीसाठी हवा एकच 'की बोर्ड'



मराठीत टायपिंग करण्यासाठी प्रमाणित कीबोर्ड कोणता, असा प्रश्‍न विचारला, तर प्रत्येकाला नेमके उत्तर देता येईलच, असे नाही. टायपिंगसाठी कोणता कीबोर्ड वापरायला सोपा आणि उपयुक्त, यावरही एकमत होऊ शकणार नाही. टायपिंगसाठी मराठीत कीबोर्ड तरी किती मॉड्यूलर, इनस्क्रिप्ट, गोदरेज, रॅमिंग्टन इत्यादी. सध्याच्या माहिती*तंत्रज्ञानाच्या युगात सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती. 
ईंग्रजीत क्वेर्टी (QWERTY) हा प्रमाणित कीबोर्ड. एकदा तो शिकला की झाले. जगात कुठल्याही संगणकावर टायपिंग करणे अगदी सहजसोपे. मराठीत अगदी विरुद्ध स्थिती. संगणक बदलला, कामाची जागा बदलली, सॉफ्टवेअर बदलले आणि मग टायपिंगसाठी वापरला जाणारा कीबोर्ड तिथे उपलब्ध नसला, तर मोठी अडचण निर्माण होते. तंत्रज्ञानाच्या युगात मराठीच्या प्रचार आणि प्रसारावर दूरगामी परिणाम करणारा हा विषय. संगणक*इंटरनेटवरील मराठीचा वापर वाढण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

पार्श्‍वभूमी* भविष्यात संगणकाचा वापर वाढणार, हे ओळखून केंद्र सरकारने "सीडॅक'च्या साह्याने १९८६ पासून भारतीय भाषांवर काम करायला सुरवात केली.
* केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रॉनिक विभागाने भारतीय भाषांसाठी इनस्क्रिप्ट हा प्रमाणित कीबोर्ड म्हणून जाहीर केला. देवनागरी, कन्नड, तमिळ, तेलगू, आसामी, ओरिया, बंगाली, मल्याळम, गुजराथी, पंजाबी इत्यादी २२ लिपींमध्ये सध्या इनस्क्रिप्टच्या साह्याने संगणकावर टायपिंग करता येते.
* केंद्र सरकारच्या माहिती*तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत "टेक्‍नोलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅग्वेजेस' असा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. 
* संगणकावर भारतातील प्रादेशिक भाषांमधून काम करता यावे, यासाठी संशोधनाचे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून "सीडॅक'च्या "ग्राफिक्‍स ऍण्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्‍नॉलॉजी' (जिस्ट) या कार्यक्रमांतर्गत करण्यात येते.
* संगणकाचा भारतीय भाषकांना स्वभाषेत वापर करता यावा, भाषेचा अडसर आल्यामुळे कोणीही संगणक शिकण्यापासून वंचित राहू नये आणि संगणक व इंटरनेटवर भारतीय भाषांचे अस्तित्त्व वाढावे, हा या सगळ्यामागील प्रमुख उद्देश.

मराठीत उपलब्ध कीबोर्ड
* देवयानी, गोदरेज, गोदरेज*१, इनस्क्रिप्ट, आयटीआर, के. पी. राव, मॉड्यूलर, एमटीएनके, फोनेटिक, रॅमिंग्टन, रॅमिंग्टन*२, स्क्रिप्ट, स्क्रिप्ट*२, डीओई, अक्षर, कॉम्पसेट, आकृती, एबीआयटीआर इत्यादी.
* मराठीत संगणकावर अक्षरजुळणी करण्यासाठी वरीलपैकी एक कीबोर्ड शिकावा लागतो. 
* इंग्रजीत शब्द टाईप केल्यावर तो मराठीत कन्व्हर्ट करण्याची सुविधा काही सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. याद्वारेही मराठीत टायपिंग करता येते. उदा. गुगल ट्रान्सलिटरेशन. याठिकाणी "marathi' असे टाईप केले आणि स्पेसबार दाबल्यानंतर "मराठी' असा शब्द टाईप होतो. 


इनस्क्रिप्ट कीबोर्डचे फायदे
* इनस्क्रिप्ट हा उच्चार शास्त्रावर आधारित कीबोर्ड आहे. 
* इनस्क्रिप्ट सर्व भारतीय भाषांसाठी उपलब्ध आहे.
* एकदा इनस्क्रिप्ट शिकल्यावर अन्य भारतीय भाषांमधूनही संगणकावर टायपिंग करता येते. त्यासाठी वेगळा कीबोर्ड शिकण्याची गरज नाही. 
* इनस्क्रिप्ट शिकल्यावर युनिकोडमध्येही टायपिंग करता येते. 
* इनस्क्रिप्टवर ग*घ, त*थ, द*ध, च*छ, प*फ इत्यादी अक्षरे संगणकाच्या एकाच "की'वर आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवणे सोपे जाते. 
* विंडोज, मॅक, लिनक्‍स तिन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्ससाठी इनस्क्रिप्ट चालू शकतो. 

एकाच कीबोर्डचा प्रचार*प्रसार केल्यास...
* शाळांमधून विद्यार्थ्यांना संगणकावर मराठी टायपिंग शिकवणे सोपे होईल.
* संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधूनही मराठी टायपिंग शिकवणे सुलभ होईल.
* ग्रामीण भागातील नागरिकांना मराठीमधून संगणक शिकवणे शक्‍य होईल.
* मोबाईलवर मराठी संदेश टाईप करण्यासाठी हॅण्डसेट निर्मिती कंपन्यांना एकच सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचा वापर करता येईल. उदा. इंग्रजीत क्वेर्टी हा प्रमाणित कीबोर्ड असल्यामुळे हॅण्डसेटवर त्यापद्धतीने कीबोर्ड देणे शक्‍य झाले. 
* युनिकोडच्या माध्यमातून जगातील कोणत्याही संगणकावर सहजपणे मराठीतून टाईप करणे शक्‍य होईल.
* इंटरनेटवरील मराठीचे अस्तित्व वाढण्यास मदत होईल. 

प्रचारासाठी काय करायला हवे?
* सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांमधून एकाच कीबोर्डचा वापर सुरू करून त्याचा प्रसार करायला हवा.
* सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण संस्था आणि संगणकाचा वापर करणाऱ्या कंपन्यांमधून मराठीतील कीबोर्डची रचना दाखविणारी जाहिरात मोहीम राबवायला हवी. 
* मराठी टाईप करणे सोपे आहे, असा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करायला हवा.
* शाळेच्या संगणक अभ्यासक्रमात एकाच कीबोर्डचा समावेश करायला हवा.
* "सीडॅक'च्या "जिस्ट'च्या कार्यक्रमांतर्गत मराठी सॉफ्टवेअरची सीडी मोफत दिली जाते. यासाठी केवळ www.ildc.gov.in  या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर सीडी घरपोच पाठविली जाते. या सीडीत मराठी भाषेचे ट्रू*टाईप फॉंट्‌स, युनिकोड फॉंट्‌स, किबोर्ड ड्रायव्हर, ओपन ऑफिसचे मराठी रुपांतर, शुद्धलेखन तपासनीस, मराठी*इंग्रजी शब्दकोष इत्यादी सॉफ्टवेअर आहेत. विविध माध्यमातून या सीडीचा प्रचार करायला हवा.

No comments:

Post a Comment