वाचायला बुवा कंटाळा येतो. त्यात आणखी काँप्युटरच्या स्क्रीनवर
वाचायचं म्हणजे तर बघायलाच नको. डोळ्याला त्रास वगैरे होतो. घरात पीसी
किंवा लॅपटॉप वगैरे आलेला असतो. हौसेने इंटरनेटची व्यवस्थाही झालेली असते.
ब्रॉडबँडच्या प्रसारामुळे इंटरनेटचा स्पीडही चांगला मिळत असतो. म्हणजे
थोडक्यात सगळं असतं. पण वाचायला कंटाळा येत असतो. म्हणजे ज्ञान नको असतं
असं नाही. ज्ञान, मीन्स नॉलेज, तर हवंच. त्याचं महत्व चांगलच कळत असतं.
ज्ञानपिपासू वृत्तीही असते.वाचनातून ज्ञान मिळतं याबद्दल दुमत वगैरे नसतच.
वाचन हवं हे कळत असतं पण वळत नसतं. जी मंडळी ह्या अशा काहीशा पेचातून चालली
असतील (आणि एवढं असूनही सौजन्यपूर्वक हा लेख वाचायची तसदी घेत असतील)
अशांसाठी इंटरनेटवरची एक वंडरफूल सोय सांगतो. इंटरनेटवरची सोय म्हणजे
अर्थातच कुठली तरी साईट असणार हे तुम्ही एव्हाना ओळखलेलं आहे. तुमचा अंदाज
बरोबर आहे. मी एका वेब साईटबद्दलच सांगतो आहे. त्या साईटचं नाव आहे - 'वंडर
हाऊ टू डॉट कॉम'.
लक्षात घ्या की साईटच्या नावातच 'हाऊ टू' आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी याचं ज्ञान देणारी ही वेब साईट आहे. पण साईटच्या नावात नुसतं 'हाऊ टू' नाही,तर त्या बरोबर 'वंडर' पण आहे. म्हणजे आश्चर्यकारकपणे शिकवणारी ही वेब साईट आहे. आता तुम्ही विचाराल की हा काय फंडा आहे? तर, त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला काहीही वाचायला न लावता प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल' पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था ह्या साईटवर आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतरही लक्षात न येण्याइतका तुमचा आयक्यू साधासुधा नाही हे सरळ आहे. तुमच्या लक्षात आलेली गोष्ट बरोबर आहे. ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे तो मोफत आहे.
लक्षात घ्या की साईटच्या नावातच 'हाऊ टू' आहे. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी याचं ज्ञान देणारी ही वेब साईट आहे. पण साईटच्या नावात नुसतं 'हाऊ टू' नाही,तर त्या बरोबर 'वंडर' पण आहे. म्हणजे आश्चर्यकारकपणे शिकवणारी ही वेब साईट आहे. आता तुम्ही विचाराल की हा काय फंडा आहे? तर, त्याचं साधं सोपं उत्तर म्हणजे तुम्हाला काहीही वाचायला न लावता प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल' पद्धतीने शिकवण्याची व्यवस्था ह्या साईटवर आहे. आता एवढी प्रस्तावना झाल्यानंतरही लक्षात न येण्याइतका तुमचा आयक्यू साधासुधा नाही हे सरळ आहे. तुमच्या लक्षात आलेली गोष्ट बरोबर आहे. ह्या साईटने 'हाऊ टू' हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला देऊ केला आहे. मुख्य म्हणजे तो मोफत आहे.
उदाहरणार्थ
पहा - गणितातले अपूर्णांक तुम्हाला शिकता येतील ते ह्या साईटवरचा व्हिडीओ
पाहून. किंवा आणखी इंटरेस्टींग सांगायचं तर डोकेदुखी घालवण्यासाठी मालीश
कसं करायचं हे प्रत्यक्ष व्हिडीओ क्लीपमध्ये दिसलं तर वाचण्यापेक्षा सोपं
आणि पक्क यात शंका नाही. ह्या खेरीज कॉंप्युटरशी संबंधित म्हणाल तर तुमच्या
किबोर्डवरची विंडोज की कशी वापरायची किंवा विंडोज एक्सपी मध्ये एका
कॉंप्युटरवर दोन मॉनिटर्स कसे लावायचे वगैरे. अशा प्रकारच्या विविध
विषयावरच्या ९०,००० (नव्वद हजार फक्त) व्हिडिओ क्लीप्स http://www.wonderhowto.com/ वर आहेत.
महिलांसाठीचे विषय
इंटरनेटवरचं मल्टीमिडीयाचं तंत्र हा ह्या साईटचा आत्मा आहे. आपल्याला शिकायची ती गोष्ट किंवा ते तंत्र चित्रपट माध्यमातून प्रत्यक्ष दिसणं ही बाब वाचनातून शिकण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. उदाहरणार्थ ह्या साईटवरचे खास महिलांसाठीचे हे काही मुख्य विषय पहाः १) सौंदर्य कला २) घर आणि बगीचा ३) अन्नपदार्थ अर्थात स्वयंपाकघरातील टीप्स ४) कौटुंबिक आणि व्यक्तीगत बाबी वगैरे.
तुम्ही ब्युटी किंवा सौंदर्य कलेच्या विषयात शिरलात तर तेथे अनेक म्हणजे एकूण ८४८ उपयुक्त व्हिडीओज तुम्हाला दिसतील. त्यातले उदाहरणादाखल हे काही पहाः कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी, कुरळ्या केसांची हाताळणी कशी करावी, कोरड्या ओठांसाठी काय करावे, परफेक्ट पोनी टेल कशी बांधावी, स्वतःचा स्वतःच फेस मसाज कसा करावा, लिपस्टीक जास्त टिकण्यासाठी काय करावे असे एक ना अनेक विषय त्यात आहेत. प्रत्यक्ष दिसत असल्याने ते समजण्यात वा शिकण्यात काहीही अडचण येत नाही.
आता दुसरा विषय घर आणि बगीचा हा घ्या. यात एकूण ३२८५ व्हिडीओ क्लीप्स आहेत. हा विषय इतर अनेक उपविषयांमध्ये विभागला आहे. त्यातले काही उपविषय पहा - स्वच्छता टापटीप, इंटिरियर डेकोरेशन, बागकाम, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साधने वगैरे. यात इनडोअर गार्डन कसे करावे, तुमच्या एलसीडी स्क्रीनवर किंवा सीडीवर किंवा प्लास्टीकवर कुठेही चरे आले असतील तर ते काढण्यासाठी साधे अंडे कसे वापरता येते, टॉवेल्सची घडी उत्तम प्रकारे कशी घालावी, उत्तम फर्निचर कसं ओळखावं वगैरे अक्षरशः शेकड्यांनी टीप्स आणि ट्रीक्स शिकवणारी तंत्रे आपल्याला प्रत्यक्ष पहायला मिळतात.
पुढला विषय अन्नपदार्थ आणि स्वयंपाकघराचा. यात एकूण ५०७० व्हिडीओ आहेत. यामध्ये एकूण २३ उपविषय आहेत. त्यात भाजणं (बेकींग) पासून ते अंड्यापर्यंत आणि चिकन पासून ते मांसापर्यंत विभागणी आहे. अंडी ह्या एका उपविषयावर १३० तर भाज्यांवर ५७६ व्हिडीओ आपण पाहू शकतो. एग करी असो की एग भुर्जी असो, उकडलेलं अंडं असो की आम्लेट असो ते कुणी ना कुणी प्रत्यक्ष केलं आहे, ते करतानाचं छान शुटींग केलं आहे, आणि ती व्हिडीओ क्लीप आपल्याला इंटरनेटवर मोफत दिली आहे. भाज्या आणि अंडी वगळता वेगवेगळ्या प्रकारची सॉसेस, मसाले, पिझा, पास्ता, फळं, ज्युसेस, फिश, सुप्स वगैरे रेलचेल ह्या प्रकारात दिसून येते.
कौटुंबिक विषयातही ही साईट मागे नाही. एकूण ७१७ व्हिडीओज तिथे आहेत. त्यात नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या काळजीपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या शुश्रुषेपर्यंत अनेक गोष्टी आहेत. बाळंतपणापासून ते पालकत्वापर्यंतचे अनेक मुद्दे स्वतंत्र चित्रफितींतून आले आहेत.
वर मी फक्त महिलांशी संबंधित विषयांची झलक दिली आहे. पण महिलांबरोबरच पुरूषांसाठीही ते सारखेच महत्वाचे आहेत. स्वयंपाकघर आणि सौंदर्य हे आणि तत्सम विषय आता दोघांसाठीही सारखेच महत्वाचे आहेत.
इतर अनेक विषय
ह्या साईटवर सॉफ्टवेअर विषयक २६३२ व्हिडीओ आहेत. एमएस ऑफिस पासून ते फोटोशॉपपर्यंत आणि फ्लॅशपासून ते फाईलमेकर पर्यंत अनेकांची हाताळणी त्यात झालेली आहे. केवळ हार्डवेअर व तत्सम विषयक ८७० व्हिडीओंचा संग्रह इथे पहायला मिळतो. त्याखेरीज इलेक्ट्रॉनिक विषयाला वाहिलेल्या वेगळ्या ७३१ क्लीप्सही त्यात आहेत. यातील अनेक व्हिडीओ क्लीप्स विद्यार्थ्यांसाठीही खूप उपयुक्त आहेत.
डाएट आणि आरोग्य ह्या विषयावरील ११७०, नृत्यविषयक ४५१, विविध कलाविषयक ११०३, एक हजारांहून अधिक जादूचे प्रयोग, पाळीव प्राणी विषयक ६४२ वगैरे विषयांची यादी खरच न संपणारी आहे. ही साईट सापडल्यानंतर पुढले कितीतरी आठवडे यातले अनेक दर्जेदार व्हिडीओ पाहण्यात मी घालवले. इथे ९०००० व्हिडीओ आहेत असा ह्या साईटचा दावा आहे. तो खरा असेलही किंवा नसेलही. पण एक मात्र नक्की की विविध विषयांवरच्या उपयुक्त अशा व्हिडीओ क्लीप्सचा खजिना तिथे आहे. तुम्हाला यांतून एखादा विशिष्ट विषय शोधायचा असेल तर 'सर्च' ची सोय त्यात आहे. पण त्याही पलिकडे एकूण ५०० व्हिडीओ ह्या साईटने टॉप म्हणून निवडूनही दिले आहेत. त्यावर नजर टाकली तरी आपले डोळे दिपून जातात.
ही साईट अमेरिकन ढंगाची आहे. तेथील संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात पुरेपूर पडलेले दिसते यात शंकाच नाही. म्हणूनच डिशवॉशर कसे वापरावेत, कसे मेंटेन करावेत वगैरे आपल्याला कदाचित अपरिचित वाटणारे व्हिडीओ त्यात दिसतात. मात्र आपल्याला उपयुक्त अशा शेकडो क्लीप्स त्यात असल्यानेच ह्या साईटला 'एंटर' मध्ये स्थान दिले.
कुठून येतात हे व्हिडीओ?
हा प्रश्न आपल्यापुढे येणं हे स्वाभाविक आहे. हे सारं प्रचंड काम कुणा एका माणसाचं खचितच नाही. खरं तर हे सारं हजारो माणसांचं मिळून झालेलं श्रमदान आहे.तुम्हीही त्यात सामील होऊ शकता. इंटरनेटवर मुशाफिरी करताना उद्या तुम्हाला एखादा हाऊ टू प्रकारातला व्हिडीओ दिसला (आणि तो मोफत असला) तर तुम्हीही तो ह्या साईटवर सबमिट करू शकता. मात्र तुम्ही कोणताही व्हिडीओ सबमिट करून चालणार नाही. तो हाऊ टू ह्या प्रकारातला असणं आवश्यक आहे.
जसजसे आपण ह्या वेबसाईटच्या अंतरंगात घुसत जातो तसतशी ही वेबसाईट एखाद्या ज्ञानकोशासारखी भासू लागते. हा ज्ञानकोश अनेक चित्रफित निर्मात्यांनी मिळून तयार केलेला आहे. अशा प्रकारचे काम हे इंटरनेटच्या माध्यमातूनच होऊ शकते. हे माध्यम अशा साईटस तयार करून वापरण्यासाठीचा प्रचंड आवाका इंग्रजीप्रमाणे आता मराठीसाठीही खुला आहे. आपण त्याचा लाभ कसा घेतो यावरच मराठीचे इंटरनेटवरील भवितव्य काय असेल हे ठरेल.
No comments:
Post a Comment