Tuesday, 17 April 2012

एथिकल हॅकिंग नवीन पर्याय

स्पर्धेच्या काळात, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणारेच आपले अस्तित्व टिकवू शकतात. 
सर्वांचा कल हा आधीपासून चालत आलेल्या व सर्वांना माहीत असलेल्या क्षेत्रांकडे म्हणजेच डॉक्‍टर, इंजिनिअरिंग, वकिली आदींकडेच असतो. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये चढाओढ आहेच पण नोकरी मिळविण्यातही प्रचंड स्पर्धा आहे. या चढाओढीच्या स्पर्धेपासून अजूनतरी लांब असलेले, परंतु भरपूर संधी असलेले एक अतिमहत्त्वाचे "नवे कोरे' क्षेत्र म्हणजे एथिकल हॅकिंग. 

एथिकल हॅकिंग हे क्षेत्र फार नावाजलेले नव्हते व याबद्दल बऱ्याच चुकीच्या संकल्पना लोकांच्या मनात होत्या. पण एथिकल हॅकिंग हा संगणक क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचा भाग मानला जातो. एथिकल हॅकिंग ही संगणक शास्त्राची एक शाखा असून ही कॉम्प्युटर सिक्‍युरिटी क्षेत्राशी निगडित आहे. आजकालच्या माहितीच्या युगात माहितीच्या सुरक्षिततेचे महत्त्व अत्यंत वाढत आहे. सतत मोठ्या प्रमाणात वाढत चालले संगणक गुन्हे(सायबर क्राइम), माहितीची होणारी चोरी(डेटा थेफ्ट) अशी मोठी गंभीर आव्हाने आयटी कंपन्यांच्या समोर आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांचेही लक्ष संगणक/ नेटवर्क सिक्‍युरिटीकडे वेधले जाऊ लागले आहे ; त्यामुळे कॉम्प्युटर व नेटवर्क सिक्‍युरिटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. 

एथिकल हॅकिंग म्हणजे नक्की काय ? 

एथिकल हॅकिंग म्हणजे चांगल्या हेतूने कॉम्प्युटर व नेटवर्कमध्ये सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेला भेदून संगणकामध्ये शिरकाव करणे. असे का केले जाते? 
आयटी कंपन्यांतील संगणक सुरक्षा यंत्रणा कशी आहे. ती किती सुरक्षित आहे त्यामध्ये काही त्रुटी आहेत का? या सर्व बाबींची सतत दखल घेणे आवश्‍यक असते. त्यासाठी एथिकल हॅकरची आवश्‍यकता भासते. 


एथिकल हॅकर्सना बोलावून कंपनीच्या संगणक सुरक्षा यंत्रणेवर निरनिराळे हॅकिंगचे प्रकार करवले जातात व त्याद्वारे संगणक सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी जाणून घेऊन त्या त्रुटी भरून काढल्या जातात. या सर्व प्रयत्नातून आयटी कंपन्या आपली संगणक सुरक्षा यंत्रणा सतत भक्कम करीत असतात. एथिकल हॅकर्सना याकामासाठी भरपूर मोबदलाही आयटी कंपन्या देतात. 


कंपन्यांमध्ये कॉम्प्युटर सिक्‍युरिटीसाठी वार्षिक बजेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केलेली असते. 
जर करिअरच्या दृष्टीने विचार केला तर या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत. 
NASSCOM या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये 2,00,000 सिक्‍युरिटी प्रोफेशनल्सची आवश्‍यकता असून ही संख्या येत्या काही वर्षात वाढणार आहे. 


या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी काय करायचं? 

सध्या एथिकल हॅकिंगचे बरेच कोर्सेस आहेत. त्यामध्ये एथिकल हॅकिंगचे वेगवेगळे प्रकार, कॉम्प्युटर व नेटवर्क सिक्‍युरिटी असे विषय शिकवले जातात. एथिकल हॅकिंग, कॉम्प्युटर व नेटवर्क सिक्‍युरिटीसाठी बरेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस आहेत. जसे 
ISC2, ISACA, SANS, EC-Council, USA इ. संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त कोर्सेस देत आहेत. 

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी एथिकल हॅकिंग हा सगळ्यात पहिला टप्पा मानला जाते. एथिकल हॅकिंगचे कोर्सेस केल्यानंतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये संधी आहेत. एथिकल हॅकिंग हे सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन, कॉम्प्युटर फॉरेन्सिक, कॉम्प्युटर व नेटवर्क सिक्‍युरिटी, सिक्‍युरिटी ऑडिट यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राशी निगडित क्षेत्र आहे. तसेच हे नवीनच क्षेत्र असल्याने या क्षेत्रात करियरच्या बऱ्याच संधी आहेच पण स्पर्धा व चढाओढ तितकी नाही. 

एथिकल हॅकिंग सेवांची आवश्‍यकता फक्त आयटी कंपन्यांमध्येच मर्यादित नसून, त्याचा उपयोग शासकीय / सरकारी क्षेत्रातही भासणार आहे. तसेच संगणकाशी निगडित सर्वच संस्थांना भविष्यात एथिकल हॅकर्सची गरज भासणार आहे. 

कॉम्प्युटरचा डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत त्यामुळे करिअर म्हणून हे क्षेत्र निवडल्यास फायद्याचे ठरेल.

No comments:

Post a Comment