Tuesday, 17 April 2012

इंटरनेट कुणाच्या मालकीचे ?


कल्पना करा की, एका बंद खोलीत मोठ्या प्रमाणात माणसे बसलेली आहेत. प्रत्येकची मातृभाषा ही वेगळी आहे व त्यांना फ़क्त तिच भाषा समजते. अशा वेळी इतक्या सर्व माणसांसोबत संवाद साधण्यासाठी तुमच्याकडे काही प्रमाणित शब्दसंग्रह व व्याकरण तयार आहे. ज्याद्वारे तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांनीन सहजतेने संवाद साधू शकता. हीच पद्धती तंतोतंत इंटरनेटमध्ये वापरण्यात आलेली आहे. संगणक विज्ञानाचा सर्वात मोठा आविष्कार असणारे इंटरनेट हे विविध प्रकारच्या संगणकाचा एकमेकांशी संवाद साधू देणारे एक मोठे माध्यम आहे.
’इंटरकनेक्टेड नेटवर्क’ चे लघुरुप म्ह्णजे इंटरनेट होय. त्याला इंटरनॅशनल नेटवर्क म्हणूनही आजकाल संबोधले जाते. अर्थात, जगातील सर्व संगणकांना जोडणारे नेटवर्क हे इंटरनेट होय. यावरुनच त्याचा पसारा किती मोठा असेल, याचा अंदाज बांधता येऊ शकेल. शिवाय जगात विविध प्रकारचे संगणकीय नेटवर्क अस्तित्वात आहेत. त्या सर्वांना जोडण्याचे काम इंटरनेटने केले आहे. कोणत्याही प्रकारचा व कोणत्याही परेटींग सिस्टिम असणारा संगणक यात सामावू शकेल, अशी इंटरनेटची व्याप्ती आहे. संगणकीय नेटवर्कचे हे एक वैशिष्ट मानता येईल. इंटरनेटद्वारे संगणक जोडणी करण्याकरीता काही नियम तयार करण्यात आलेली आहे. त्यांना तांत्रिक भाषेत ‘प्रोटोकॉल म्हणून संबोधले जाते. इंटरप्रिटर अर्थात दुभाष्या जे काम करतो, तेच काम संगणकासाठी प्रोटोकॉलद्वारे साध्य केले जाते. इंटरनेटच्या या विश्वात केवळ संगणकच नसून राऊटर नेटवर्क एक्सस पॉइंट सॅटेलाईट लाखो किलोमिटर्स च्या वायर्स तसेच वायरलेस राऊटर्स ह्यांचाही समावेश होतो. सातासमुद्रापार जाणारे सर्व देशांच्या सीमारेषा पार करणारे जगातल्या प्रत्येक माणसाला जोडू शकणारे इंटरनेट हे खऱ्या अर्थाने वैश्विक नेटवर्क आहे. त्याची वाढ दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत आहे. तसं पाहिलं तर इंटरनेट म्हणजे अनेक छोट्या सिस्टिमला जोडणारी एक मोठी सिस्टिम आहे. त्यामुळे अशा या वैश्विक पद्धतीच्या नेटवर्कचा मालक कोण असावा? हा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिकच आहे. आज जगात अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना कोणाची तरी मालकी असते, तशीच ती इंटरनेटलाही आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा घेतलेला हा आढावा-
इंटरनेट या संकल्पनेचा जन्म ‘आर्पानेट’ ह्या जगातील पहिला कॉम्प्युटर नेटवर्कने दिला. ज्या काळात संगणक केवळ मोठमोठी विद्यापीठे व संशोधन संस्थांकडेच असायचे त्या काळात संगणकांना नेटवर्कद्वारे जोडण्याची संकल्पना पुढे आली व ‘आर्पानेट’ चा जन्म झाला. हे नेटवर्क तयार करणा-या तज्ञांनी निरनिराळे प्रोटोकॉल्स तयार केले. हेच प्रोटोकॉल्स आजही इंटरनेटमध्ये वापरण्यात येतात. आर्पानेट मध्ये विविध कंपन्यांनी बनविलेल्या संगणकाचा समावेश होतो. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या संगणकात सूसूत्रता साधण्यासाठी आदर्श नेटवर्क प्रोटोकॉल ची रचना तज्ञांनी केली. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडे सर्वप्रथम ‘आर्पानेट’ ची मालकी होती. अर्थात एकेकाळी अमेरीकन सरकार इंटरनेटचे मालक होते, असे मानायला हरकत नाही. असे असले तरी आज इंटरनेटचे मालक कोण? या प्रश्नाला दोन उत्तरे देता येतील. पहिले – ‘कुणीही नाही’ व दुसरे ‘खूप सारे लोक’ ते कसे आपण पाहूया.
इंटरनेट ही टेलिफ़ोन जाळ्यासारखीच एक रचना आहे. ज्याला कॉम्प्युटर नेटवर्कचे नेटवर्क म्हणता येईल. जगातील बऱ्याच संस्था व कंपन्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या इंटरनेटचे नियंत्रण करत असतात. त्यामुळे कोणीही एक जण असे म्हणू शकत नाही की, ‘इंटरनेट हे माझ्या मालकीचे आहे! एकेकाळी अमेरीकेत इंटरनेटची सुरुवात झाली असली तरी अमेरीकाही त्याची आज मालक नाही. दुसऱ्या एका दृष्टीकोनातून असेही म्हणता येईल की, इंटरनेटला खूप सारे मालक आहेत. कारण वरती नमूद केल्याप्रमाणे इंटरनेट हे संगणकाच्या नेटवर्कचे नेटवर्क आहे व या विविध कॉम्प्युटर नेटवर्कचे मालक मात्र तितकेच आहेत. प्रत्येकाच्या मालकीचे नेटवर्क इंटरनेटद्वारे जोडले जाते. एखाद्या नेटवर्कचे मालक त्याच्या दर्जाचे व नेटवर्कमधील अधिमारांचे नियंत्रण करीत असतात. त्यामुळे पुर्ण इंटरनेटचे मालक नसले तरी आपल्या इंटरनेट वापरावर त्यांचा प्रभाव मात्र निश्चित पडत असतो.
आयएसपी अर्थात ‘इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर’ बद्द्ल आपण ऐकले असेलच. ग्राहकाला इंटरनेट सुविधा देणाऱ्या संस्था ह्या आयएसपी म्हणून ओळखल्या जातात. उदा. बीएसएनएल, एमटीएनएल, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडीया ह्या कंपन्याद्वारे इंटरनेट सुविधा दिली जाते. म्हणजेच त्या आयएसपी होत. इंटरनेटला सामान्य ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम ह्या कंपन्या करत आसतात. ह्या कंपन्याही इंटरनेटच्या मालक नव्हेत. आपल्या वायर्स व केबल्सच्या जाळ्याद्वारे त्या अन्य कॉम्प्युटर नेटवर्कशी स्वत:ची जोडणी करतात व त्यातून ग्राहकांना इंटरनेटची सुविधा दिली जाते. प्रत्येक छोट्या-छोट्या कॉम्प्युटर नेटवर्क मध्ये संगणकाला दिलेल्या अधिकारानुसार इंटरनेटची सुविधा वापरली जाते. कसेही असले तरी इंटरनेटची काळजी घेण्याकरिता काही आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. तसेच इंटरनेटची प्रमाणके ठरविण्याचे व प्रोटोकॉल तयार करण्याचे कामही ह्या संस्था करतात.
१)      इंटरनेट सोसायटी - इंटरनेटचे स्टॅंण्डर्ड्स ठरविण्याचे काम ही संस्था करते.
२)      इंटरनेट इंजिनिअरींग टास्क फ़ोर्स (IETF) कोणीही सभासद होऊ शकेल, अशी ही संस्था आहे. ह्या संस्थेचे अनेक गट कार्यरत आहेत प्रत्येक गट हा इंटरनेटच्या विशिष्ट बाबीवर कार्य करत असतो. उदा. इंटरनेट सुरक्षा कशी वाढवता येईल, याकरीता पॉलिसी ठरविण्याचे काम करणे. हे गट इंटरनेट्ची रचना व स्थैर्य अबाधित ठेवण्याचे काम करतात.
३)      इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड (IAB): इंटरनेटचे प्रोटोकॉल व प्रमाणके तयार करण्याचे काम ही समिती करते.
४)      इंटरनेट कॉर्पोरेशन फ़ॉर असाईन्ड एन्ड नंबर्स (आयकॅन):- इंटरनेट्वरील प्रत्येक वेबसाईटला डोमेन नेम असते. उदा. www.howstuffworks.com ह्या नावावरुन वेबसाईट्सची ओळख इंटरनेट वापरकर्त्याला येते. शिवाय ह्याच नावाला संगणकाद्वारे ओळखण्यासाठी त्याला एक विशिष्ट क्रमांकही दिलेला असतो, त्यास IP Addressम्हणतात. आपल्या वेबसाईटला डोमेन नेम व IP Address देण्याचे काम ‘आयकॅन’ ही संस्था करते. डोमेन नेम उपलब्ध असेल तरच ते ग्राहकाला देता येते. त्यामुळे एकच डोमेन नेम जर उपलब्ध असेल तरच ते ग्राहकाला देता येते. त्यामुळे एकच डोमेन नेम दोन वेबसाइट्सला देता येत नाही.
इंतरनेटला कोणीतरी एकच मालक नाही मात्र त्यावर प्रभाव टाकणारे अनेक मालक आहेत. अर्थात, इंटरनेटला केंद्रशासन नाही. ते एक अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेले वैश्विक संगणक नेटवर्क होय.

No comments:

Post a Comment