Tuesday, 7 August 2012

ऑनलाइन शॉपिंग ः नवा पर्याय

तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा एक फायदा म्हणजे आपण घरबसल्या खरेदी करू लागलो; पण अशा व्यवहारात कधी कधी तांत्रिक अडचणींमुळे तर कधी ग्राहकांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे फसवणूक झाल्याची भावना येते. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंगमधले dos and don'ts जाणून घ्या आणि घरबसल्या खरेदीचा आनंद लुटा.

ऑनलाइन खरेदी कशी करावी?
- क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करता येते.
- इंटरनेट बॅंकिंगच्या माध्यमातूनही अशी खरेदी करता येऊ शकते.
- अशा खरेदीसाठी बॅंकेकडून इंटरनेट बॅंकिंग पीन (क्रमांक) घ्यावा लागतो.
- अनेकदा ऑनलाइन खरेदीवर जादा पैसे आकारले जातात. याची ग्राहकांनी आधीच माहिती करून घ्यावी.

काय फायदे असतात?
- इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करताना वेळेची बचत होते.
- परदेशातील दुकानातूनसुद्धा खरेदी करता येते.
- कधी कधी बॅंकांकडून किंवा दुकानांनकडून ऑनलाइन खरेदीवर सवलती दिल्या जातात.
- अनेकदा वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था असते.
- ऑनलाइन व्यवहारात धोका वाटत असेल, तर "कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय आज अनेकांनी उपलब्ध करून दिला आहे.
- या पर्यायात वस्तूचे केवळ बुकिंग इंटरनेटवरून केले जाते व ती वस्तू आपल्या हातात मिळाल्यावर त्याचे पैसे द्यावे लागतात.

काय धोके असतात?
- पासवर्ड गहाळ झाल्याने ऑनलाइन व्यवहार तात्पुरते बंद होऊ शकतात.
- आपला पासवर्ड कोणाला समजल्यास पैशांचा गैरवापर केला जाऊ शकतो.
- आपण काय खरेदी करतो आहोत, याची माहिती घेतली पाहिजे. नाहीतर चुकीची वस्तू खरेदी केली जाऊ शकते.
- आपल्या खात्याचा अकाउंट क्रमांक नीट लिहिला पाहिजे.

काय काळजी घ्यावी?
- ऑनलाइन खरेदी करताना पीन क्रमांक व पासवर्ड नीट लक्षात ठेवणे गरजेचे असते.
- आपल्या पासवर्डमध्ये शक्‍यतो आपले नाव घेऊ नये.
- ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलावा.
- पासवर्ड शक्‍यतो कुठेही लिहून ठेवू नये.
- क्रेडिट किंवा डेबिट कार्डमार्फत खरेदी करताना कार्डावरील क्रमांक गोपनीय ठेवावा.

खरेदी करा; पण जपून!
- क्रेडिट कार्डचा वापर करून आपण पैशाचा व्यवहार करत असाल, तर जरा काळजीपूर्वक राहिले पाहिजे.
- आजकाल बऱ्याच वेबसाईट secured payment gateway चा वापर करतात. ऑनलाइन व्यवहार करायच्या आधी आपण सुरक्षित ठिकाणी व अशा गेटवेमध्ये आहोत याची प्रथम खातरजमा करून घ्यावी.
- आपला क्रेडिट कार्ड क्रमांक व विशेषतः 3 अंकी cvs क्रमांक गुप्त ठेवावा.
- आज आपण वापरतो त्या क्रेडिट (किंवा डेबिट किंवा एटीएम) कार्डचे व्यवहार त्या कार्डामागच्या काळ्या रंगाच्या चुंबकीय पट्टीत साठवलेल्या सांकेतिक माहितीनुसार होतात. या पट्टीची नक्कल करणे किंवा त्यामधील माहिती चोरणे (हॅक करणे) सहज शक्‍य असते.
- जी काळजी आपण भौतिक जगात क्रेडिट कार्ड सांभाळण्यासाठी घेतो; तितकीच काळजी आपण ऑनलाइन खरेदीबाबतही राहिले पाहिजे.
- आपला क्रेडिट कार्ड क्रमांक हा गुप्त असला पाहिजे.
- शक्‍यतो सायबर कॅफेतून असे व्यवहार करू नयेत; कारण त्या संगणकावर काय प्रणाली आहेत हे आपल्याला ठाऊक नसते.
- काही हॅकर्स अशा संगणकावर क्रमांक लक्षात ठेवायचे छुपे मनसुबे ठेवून आपल्यावर ऑनलाइन पाळत ठेवू शकतात.
- आपण वेबवर काय फॉर्म भरत आहोत तेही काळजीपूर्वक बघावे.
- Identity theft म्हणजे आपल्या वैयक्तिक माहितीची चोरी, हा प्रकार बरेच वेळा वापरकर्त्याच्या निष्काळजीपणामुळे घडतो.
- सर्व क्रेडिट कार्ड व्यवहारात एसएमएस ऍलर्टचा पर्याय जरूर निवडावा, म्हणजे ऑनलाइन व्यवहाराचा पुरावा राहतो.



पासवर्ड विसरल्यास काय करावे?
- इंटरनेटवरील व्यवहारांत अनेक वेबसाइट्‌सचे अनेक पासवर्डस लक्षात ठेवणे कठीण असते, त्यामुळे पासवर्ड विसरण्याची दाट शक्‍यता असते.
- पासवर्ड विसरल्यास, "रिसेट पासवर्ड' असा एक पर्याय वेबसाइटवरच उपलब्ध करून दिलेला असतो.
- बॅंकेत जाऊन आपल्या पासवर्डची मागणी करता येऊ शकते.
- पासवर्ड लक्षात ठेवण्याची काळजी दूर करण्यासाठी इंटरनेटवर अनेक टूल्स उपलब्ध आहेत.
- त्यापैकीच एक म्हणजे पासवर्ड सेफ प्रोग्रॅम.
- हा प्रोग्रॅम आपल्या कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून त्यात आपले सगळे पासवर्ड नोंद करून ठेवता येतात.
- हा प्रोग्रॅम ओपन करण्यासाठीही एक पासवर्ड असतो. तो मात्र लक्षात ठेवावा लागतो.
- पासवर्डशिवाय इतर कुणालाही त्या प्रोग्रॅममधील माहिती दिसू शकत नाही.

इंटरनेटचा असाही परिणाम!
इंटरनेटचे जाळे आता इतके विस्तारले आहे, की येत्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदी भारतातही लोकप्रिय होईल. परदेशात याची लोकप्रियता व वापर कसा वाढला आहे, हे एका उदाहरणावरून स्पष्ट कळू शकते. अमेरिका आणि युरोपमध्ये "बॉर्डर्स' ही पुस्तकांच्या दुकानांची मोठी साखळी काही वर्षांपूर्वी होती; मात्र "ऍमेझॉन' या पुस्तक विश्‍वातील ऑनलाइन खरेदीच्या वेबसाइटने आज इतकी प्रगती केली आहे, की "बॉर्डर्स'च्या दुकानांना त्याचा फटका बसला आहे. त्यांच्या अनेक शाखा बंद झाल्या आहेत. इंटरनेटवरील 95 ते 97 टक्के व्यवहार पारदर्शी असतात. त्यामुळे अधिक पैसे कापले गेल्यास किंवा पैसे कापले जाऊनही वस्तू न मिळाल्यास त्याचा योग्य पाठपुरावा करता येतो.

No comments:

Post a Comment