Tuesday, 16 October 2012

युट्यूब बॉक्स ऑफिस


इंटरनेटवर सिनेमा बघायचं म्हणजे प्रचंड कष्ट . एकतर २३ ते २४ भागांत तो सिनेमा एखाद्या वेबसाइटवर असतो . आपल्याकडे इंटरनेट कनेक्शनचा घोळ असल्यामुळे १५ मिनिटांचा एक व्हिडिओ बफर व्हायला किमान अर्धा तास लागतो . त्याशिवाय सगळे सिनेेमे एकाच ठिकाणी मिळतील याची सोय नाही . अशा सगळ्या परिस्थितीवर युट्यूबने मात्र भारीच तोडगा काढला आहे . युट्यूबने थेट ऑनलाइन बॉक्स ऑफिसच सुरू केलं आहे . ज्यामध्ये सध्याच्या घडीला २० सिनेमे ठेवले आहेत . विशेष म्हणजे हा बॉक्स ऑफिस विनामूल्य आहे .


व्हिडिओसाठी युट्यूब ही वेबसाइट प्रसिद्ध आहेच . सिनेमांमधले काही निवडक सीन्स या वेबसाइटवर नेहमीच बघितले जातात . त्यांना असणाऱ्या हिट्सची संख्याही मोठी आहे . भारतीय बाजारपेठेत यापूर्वी नेटफ्लिक्स आणि गुगलने सिनेमांसाठी विशेष तरतूद केली आहे . गुगलने मूव्ही रेण्टल सर्व्हिस सुरू केली आहे तर दुसरीकडे नेटफ्लिक्सही ऑनलाइन सिनेमामध्ये उतरण्यासाठी प्रयत्नशील आहे . अशा परिस्थितीत युट्यूबने मात्र थेट बॉक्स ऑफिस सुरू केल्यामुळे नेटिझन्समध्ये सकारात्मक वातावरण आहे .


आत्ताच्या घडीला या बॉक्स ऑफिसमध्ये दिल तो बच्चा है जी , धमाल , साथिया , परदेस , चुपके चुपके , पडोसन , गोलमाल , आनंद असे तब्बल २० सिनेमे टाकण्यात आले आहेत . थिएटरमध्ये सिनेमा दाखवताना अनेकदा काही सीन्स डिलीट करण्यात येतात . अनेकवेळा काही दृष्य दाखवली जात नाहीत . युट्यूब बॉक्स ऑफिसमध्ये मात्र डिलीटेड सीन्सही दाखवण्यात येणार आहेत . दीड हजारच्या वर सिनेमांचा कॅटलॉग युट्यूबतर्फे बनवण्यात येणार आहे . यामध्ये स्थानिक भाषांतले सिनेमेही दाखवण्यात येणार आहेत . त्यासाठी विविध प्रॉडक्शन कंपन्यांशी बोलणी करण्यात सध्या युट्यूबचे अधिकारी गुंतले आहेत .


बॉक्स ऑफिसची ही संकल्पना चांगली असली तरी भारतात इंटरनेट क्षेत्रात असणाऱ्या अडचणींचा विचारही युट्यूबला करावा लागेल असे नेटिझन्समध्ये बोललं जात आहे . यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असेल तो म्हणजे ब्रॉडबॅण्ड स्पीडचा . इंटरनेटचा स्पीड कमी असल्यामुळे बफरिंगमध्येच अधिक वेळ जातो . त्यामुळे तीन तासांचा सिनेमा बघताना नक्की किती वेळ कम्प्युटरसमोर बसावं लागेल याचा काही नेम नाही . म्हणूनच केवळ इंटरनेट कनेक्शनमुळे या चांगल्या संकल्पनेचे तीन तेरा वाजले नाहीत म्हणजे मिळवलं अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

No comments:

Post a Comment