नेटवर्कचे प्रकार कोणते ते आपण मागच्या लेखात पाहिले.
LAN , MAN , WAN हे प्रकार नेटवर्क किती जागेमध्ये तयार केले आहे त्यावरून आले आहेत. नेटवर्कमध्ये संदेशवहनासाठी कोणते माध्यम वापरले आहे त्यावरून नेटवर्कचे वर्गीकरण केले जाते.
१. इथरनेट नेटवर्क - यामध्ये कॉपर केबल वापरून नेटवर्क केले जाते. यात इलेक्ट्रीसिटी सिग्नलच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.
२. वायरलेस नेटवर्क - यामध्ये रेडिओतरंगाच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.
३. फायबर ऑप्टिक नेटवर्क - यामध्ये फायबर ऑप्टिक केबल वापरून नेटवर्क केले जाते . यामध्ये प्रकाशलहरींच्या माध्यमातून संदेशवहन केले जाते.
कोणत्याही ठिकाणी नेटवर्क तयार करण्यासाठी गरज असते ती वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची ज्याला नेटवर्किंग डिव्हायसेस असे म्हंटले जाते. नेटवर्किंग डिव्हायसेस कोणती , त्यांचे प्रकार , उपयोग यांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.
१. नेटवर्क कार्ड - आपला संगणक नेटवर्कला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच LAN card , LAN adapter अशी वेगवेगळी नावे आहेत . नेटवर्क कार्ड वेगवेगळ्या प्रकारची असतात जसे की ‘इथरनेट’ LAN कार्ड , वायरलेस LAN कार्ड , फायबर ऑप्टिक कार्ड इ.आपण कोणत्या प्रकारचे माध्यम वापरणार आहोत त्यावर कोणते कार्ड वापरायचे हे अवलंबून आहे.
२. नेटवर्क केबल - कॉपर केबल आणि फायबर ऑप्टिक केबल हे यात मुख्य प्रकार असून कॉपर केबलच्या जाडीवरून UTP , STP, co-axial असे वेगवेगळे उपप्रकार आहेत. यापैकी UTP या प्रकारची cat 5 किंवा cat 6 ही केबल इथरनेट LAN मध्ये वापरली जाते.
३. रीपीटर - कॉपर केबल वापरून जेव्हा संदेशवहन केले जाते तेव्हा त्यामध्ये असणार्या resistance मुळे हा संदेश विशिष्ट अंतर पार करून गेल्यावर कमजोर होतो व त्यामुळे destination ला संदेश योग्य रितीने मिळत नाही. त्यासाठी रीपीटर हे उपकरण सिग्नलची stength वाढवायला मदत करते.
४. हब ,ब्रिज - दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी पूर्वी हे उपकरण वापरले जायचे. पण यामार्फत होणार्या संदेशवहनाचा वेग खूपच कमी म्हणजे ४ ते १६ Mbps इतका असतो.
५. स्वीच -दोनपेक्षा जास्त संगणक जोडण्यासाठी हे उपकरण सध्या वापरतात. यामध्ये ८ पोर्ट, १६ पोर्ट , १२० पोर्ट असे बरेच प्रकार आहेत.यामुळे आपल्याला १०० ते १००० Mbps इतका वेग संदेशवनासाठी मिळू शकतो. तसेच Configurable switch वापरून आपण Virtual LAN तयार करू शकतो.
६. राऊटर - दोन किंवा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये संदेशवहन करण्यासाठी राऊटर वापरणे गरजेचे आहे. सिस्को, ज्युनिपर, सॅमसंग यासारख्या कंपन्या राऊटर तयार करतात.
७. अॅक्सेस पॉइंट - इथरनेट नेटवर्क आणि वायरलेस नेटवर्क यांना एकत्र जोडण्यासाठी हे उपकरण वापरतात.
कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची नेटवर्किंग डिव्हायसेस वापरावी लागतील हे आपण कोणत्या प्रकारचे नेटवर्क तयार करणार आहोत यावर अवलंबून आहे. उदा. जर आपल्याला ‘इथरनेट’ या प्रकारचे LAN तयार करायचे असेल तर UTP या प्रकारची केबल , ‘इथरनेट’ LAN कार्ड , स्वीच असे डिव्हायसेस वापरावे लागतात , तर ‘वायरलेस’ या प्रकारचे LAN तयार करण्यासाठी वायरलेस LAN कार्ड , अॅक्सेस पॉईंट असे डिव्हायसेस वापरावे लागतात . थोडक्यात आपल्या गरजेनुसार कोणत्या प्रकारचे LAN तयार करायचे आहे ते ठरवून प्रथम त्याचा ले-आऊट काढून घ्यावा लागतो. नंतर डिव्हायसेसच्या गरजेनुसार त्यांची जागा ठरवून घ्यावी लागते. आणि नंतर LAN चा सेटअप तयार करावा लागतो.
—
No comments:
Post a Comment