कॉम्पुटरवरून फोन लावणे ही कल्पना आजवर आपल्याला अगदी अशक्य वाटणारी; परंतु गुगलने ते आता शक्य केले आहे. फोनचा वापर न करताही थेट गुगलवरूनच आपल्याला बोलता येणार आहे. अर्थात, भारतात याला परवानगी नाही; परंतु जागतिक पातळीवर ही कल्पना खूप पॉप्युलर ठरणार आहे.
इंटरनेटपासून सुरवात करून इतरही व्यवसायांमध्ये आपले हातपाय रुजवायचा जोरदार प्रयत्न करणाऱ्या "गूगल'नं आधी स्वतःचा मोबाईल फोन बनवला आणि आता तर "गूगल' जगात सर्वांत जास्त लोकप्रिय असलेल्या त्यांच्या "जीमेल' या इमेलमधूनच कोणालाही करायची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. म्हणजेच "जीमेल' वापरणाऱ्यांना त्यांच्या "जीमेल'च्या मेनूमध्येच कोणालाही फोन करायची एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक केले, की ज्या माणसाला फोन करायचा, त्याचा नंबर टाईप करायचा, की झाले! "जीमेल' त्या माणसाला फोन लावेल आणि "जीमेल' युजर त्याच्या संगणकावर स्पीकर आणि मायक्रोफोन वापरून त्या फोन लावलेल्या माणसाशी नेहमीसारखा बोलू शकेल!
अर्थातच गूगल ही कंपनी या प्रकारची सुविधा पुरवणारी पहिली कंपनी मात्र अजिबात नाही. कित्येक कंपन्यांनी यासंबंधी आधीही प्रयत्न केले आहेत. त्यातील सर्वांत यशस्वी ठरलेली कंपनी म्हणजे "स्काईप'. "स्काईप'ची सुविधा वापरून सुरवातीला लोक आपल्या संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फोन करू शकायचे. त्यासाठी फोन करणारा आणि ज्या माणसाच्या संगणकावर फोन करायचा आहे, तो अशा दोघांनाही "स्काईप' कंपनीकडून ठराविक दरानं ही सुविधा विकत घ्यावी लागायची. नंतर हळूहळू "स्काईप'नं केवळ एक संगणकावरून दुसऱ्या संगणकावरच फोन करू देण्यापेक्षा आपल्या नेहमीच्या लॅंडलाइनवरून संगणकावर किंवा संगणकावरून लॅंडलाइनवर फोन करायची सुविधा पण उपलब्ध करून दिली. हे सगळं खूप लोकप्रिय ठरलं. कारण याची किंमतसुद्धा खूपच कमी होती. अजूनही "स्काईप' ही एक स्वतंत्र कंपनीच आहे. आता तिला "सिस्को' कंपनी विकत घेणार किंवा "स्काईप'चा "आयपीओ' शेअर बाजारात येणार, असं म्हटलं जातं.
त्यानंतर आता "गूगल'नं "जीमेल'मधूनच कुणालाही फोन लावयाची किंवा कुठूनही जीमेल युज करणाऱ्या व्यक्तीच्या संगणकाला फोन लावायची सुविधा उपलब्ध करून दिली, तर साहजिकच "स्काईप'च्या दृष्टीनं ही मोठी डोकेदुखीच ठरेल. कारण "स्काईप'नं अतिशय स्वस्तात लाखो लोकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवेला आता गूगल जोरदार प्रतिकार करून "स्काईप'ला मोठ्या प्रमाणावर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकणार, हे नक्की.
हा प्रकार चालतो कसा?
हा सगळा प्रकार तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं कसा चालतो? जेव्हा स्काईप किंवा आता जीमेल वापरून संगणक वापरणारा एक माणूस जेव्हा संगणक वापरणाऱ्या व्यक्तीला फोन करतो तेव्हा काय घडतं? जसं इंटरनेटवरून नेहमी आपण पाठवलेल्या ईमेल किंवा इतर सगळी माहिती संगणकांच्या जाळ्यांमधून एकीकडून दुसरीकडे नेली जाते,
त्याच तत्त्वावर आता आपलं बोलणं एकीकडून दुसरीकडे नेलं जातं. म्हणजेच आपण जे बोलतो त्याचं रूपांतर आपला संगणक "स्काईप' कंपनीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून "बिट्स'मध्ये करून टाकतो. मग इंटरनेटमधून ज्याप्रमाणे इमेल किंवा इतर माहिती जशी नेली जाते;
तसेच आपल्या आवाजाचे "बिट्स' पण एकीकडून दुसरीकडे नेले जातात. दुसरीकडच्या संगणकावर हे बिट्स पोहोचले, की तिथल्या स्काईप सॉफ्टवेअरच्या मदतीने तो संगणक या बिट्सचे रूपांतर पुन्हा आपल्या मूळच्या आवाजात करतो आणि त्यामुळे दुसऱ्या टोकाकडील व्यक्तीला आपलं बोलणं त्याच्या संगणकावर ऐकू येतं. तो माणूस बोलला की अगदी हाच घटनाक्रम पुन्हा होतो, फक्त उलट दिशेनं; आणि त्यामुळे आता आपल्याला त्या माणसाचं बोलणं आपल्या संगणकावर ऐकू येतं.
एका संगणकापासून दुसऱ्या संगणकापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा आपला आवाज अशा प्रकारे नेला जातो, तेव्हा त्या तंत्रज्ञानाला "व्हॉईस ओव्हर आयपी (व्हीओआयपी)' असे म्हणतात. "स्काईप' आणि आता "गूगल' प्रामुख्यानं हेच तंत्रज्ञान वापरणार. यात नेहमीच्या टेलिफोन केबल्सचा वापर अजिबात होत नसल्यामुळे त्यात फक्त इंटरनेट वापरायचा खर्च आणि "स्काईप'! किंवा आता "गूगल' यांची फी, इतकाच खर्च येतो.
म्हणूनच हा प्रकार खूप स्वस्त असतो. जेव्हा संगणकावरून लॅंडलाइनला किंवा लॅंडलाइनवरून संगणकाला फोन करायचा असतो, तेव्हा मात्र त्यात फक्त इंटरनेटचा वापर न होता टेलिफोनच्या जाळ्याचा थोडा तरी वापर करावा लागतो आणि म्हणून या सुविधेसाठी नेहमीच्या टेलिफोन कॉलपेक्षा स्वस्त; पण फक्त संगणक ते संगणक याहून थोडा जास्त, असा मधला खर्च येतो.
भारतात या सगळ्याला अजून परवानगी नाही, कारण सरकारला टेलिफोन कंपन्यांचंही हित जपायचं आहे. पण जागतिक पातळीवर मात्र "गूगल'ची ही चाल नवीच धूम माजवणार यात शंकाच नाही!