Friday, 19 October 2012

ऑनलाईन मोबाईल रिचार्ज


तुम्ही ज्या कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरत आहात, त्याच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर सहजतेने तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करता येत असेल, तर ही गोष्ट खूपच छान आहे. पण जर तसं करणं शक्य नसेल... उदा. तुमच्या विशिष्ट बॅंकेचे ऑनलाईन आकाऊंट ते स्विकारत नाहीत... इ.इ. तर त्यासाठी तुम्हाला rechargeitnow.com ही वेबसाईट वापरता येईल. ccavenue चे मर्चंट अकाऊंट ते वापरत असल्याने, भारतातील अगदी कोणत्याही बॅंकेचे ऑनलाईन बॅंकिंक, ए.टी.एम. कार्ड ते स्विकारतात. याशिवाय या वेबसाईटचा वापर करुन तुम्ही डिश टि.व्ही., टाटा स्काय, सन डायरेक्ट यांच्या ‘डायरेक्ट टु होम’ सेवा देखील रिचर्ज करु शकाल.


१. त्यासाठी आधी rechargeitnow.com या वेबसाईटवर रजिस्टर व्हा. साईन-इन करा.
२. mobile, DTH, TATA WALKY यापॆकी काय रिचार्ज करायचे आहे ते निवडा.
३. त्यानंतर ती सेवा पुरवणारा सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. ‘GO’ वर क्लिक करा.
४. त्यानंतर उघडल्या जाणा-या पानावर कितीचा रिचार्ज करायचा आहे ते सांगा. ‘Continue’ वर क्लिक करा.
५. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बॅंकिंग यापॆकी ज्याचा उपयोग तुम्ही पॆशे देण्यासाठी करणार आहात त्याची निवड करा. आणि बॅंकेचे नाव सांगा.
६. ‘टर्मस् आणि कंडिशन्स्’ ना चेक करा. ‘Buy Now’ वर क्लिक करा.
७. त्यानंतर तुमची माहिती असलेला फॉर्म उघडला जाईल. तिथे खाली परत एकदा ‘पेमेंट मोड’ सिलेक्ट करा आणी तो फॉर्म ‘सबमिट’ करा.
८. ‘नेट बॅंकिंक’ बाबत आपल्या बॅंक आकाऊंट मध्ये लॉग-इन व्हा.
९. तुम्हाला पावती दिसेल ती ‘confirm’ करा. छोट्या-मोठ्या ऒपचारिकता पूर्ण करा.
१०. त्यानंतर तुम्ही rechargeitnow वर परताल. तिथे तुमच्या बिलाची पावती असेल, ती तुम्ही प्रिंट करु शकाल.
११. तुमचा मोबाईल रिचार्ज झालेला असेल! साईन-आऊट व्हा.

* मला वाटतं असा ऑनलाईन रिचार्ज पहिल्यांदाच करत असाल, तर तो ५० रु. चाच करुन पहावा. त्यातून तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागतं ते समजेल. आणि पुढच्यावेळी रिचार्ज करताना रिचार्ज करायची अमाऊंट तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाप्रमाणे ठरवावी :-) पण फार काळजी करु नये... ही साईट विश्वसनीय आहे. ऍलेक्सा रॅंकिंगमध्ये या वेबसाईटचा भारतीय क्रमांक १२३१ आहे. (ई-सकाळचा ५४९०). यावरुन भारतातील अनेक लोक आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी rechargeitnow ही वेबसाईट वापरतात याबाबत खात्री असावी. तर मग पुढच्यावेळी तुमचा मोबाईल राचार्ज करायची वेळ आली असेल, पण तुमच्याकडे बाहेर जायला वेळ नसेल, अशावेळी ऑनलाईन रिचार्ज हा कदाचीत तुमच्यासमोरील सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.

मोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर


संपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता आला तर!? असं झालं तर जगाच्या पाठीवर तुम्ही कधीही हरवणार नाही. आणि वाटेतील अनोळखी रस्त्यांची तुम्हाला कधी भिती वाटणार नाही.
(सूचना - खाली रिकामी जागा दिसत आहे!? त्या तिथे एक व्हिडिओ आहे. तो दिसत नसेल तर, पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण स्वरुपात उघडावा.)

 


 

पुन्हा एकदा गुगलने यासाठी एक दर्जेदार सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच वापरायचं आहे. याचं नाव आहे ‘गुगल मॅप्स’.


१. ‘गुगल मॅप्स’ वापरण्याकरता तुमच्या मोबाईलवरुन m.google.co.in/maps या पत्त्यावर जा.
२. ‘गुगल मॅप्स’ आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घा.
३. ‘गुगल मॅप्स’ ओपन केल्यानंतर मोबाईलवरील बटणांच्या सहाय्याने वापरावयाचे हे शॉर्टकट्स लक्षात ठेवा. ‘२’ या बटणाने ‘मॅप व्हू’ आणि ‘सॅटेलाईट व्हू’ यांदरम्यान स्विच होईल. ‘झुम इन’ साठी ३ नंबरचे बटण आणि ‘झुम आऊट’ साठी १ नंबर बटण वापरावे लागेल. ट्रॅफिक पाहण्यासाठी ७ नंबरचे बटण आणि एखादे लोकेशन फेव्हरेट म्हणून सेव्ह करण्यासाठी * बटणाचा वापर करता येईल. ‘गुगल मॅप्स’वर ‘डायरेक्शन’ पाहण्याची सोयही उपलब्ध आहे.

असंच शहरात फिरता फिरता एकदा रस्ता भटकल्यावर मी माझ्या मित्राला ‘गुगल मॅप्स’ बद्दल सांगितलं. आणि त्याला त्याच्या मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ इंस्टॉल करुन दिलं, तेंव्हा ते पाहून त्याला फारच आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. आम्ही दोघांनी मिळून लगेच आम्हाला जायचं होतं ते ठिकाण शोधून काढलं. शेवटी अंधळ्याला काठीचा आधार आणि बुडत्याला काडीचा आधार (हे या इथे जुळलं तर जुळवून घ्या नाहीतर सोडून द्या :-) अशाप्रकारे कधी बाहेर गावी, दुस-या राज्यात फिरायला गेल्यावर, जर तुम्ही रस्ता भटकलात, तर त्यावेळी आपल्या मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ ओपन करायला विसरु नका.

पासवर्ड तयार करा


आज आपण माहिती घेणार आहोत ती स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्याबाबत, म्हणजेच पासवर्ड जनरेटर, पासवर्ड क्रिएटर बाबत. बर्‍याचदा आपले पासवर्ड हे असे असतात जे आपल्याच आसपासच्या व्यक्तींपासून, गोष्टींपासून प्रेरणा घेऊन ठेवलेले असतात. अशावेळी ते तितकेसे भक्कम असत नाहीत. आपली ऑनलाईन प्रायव्हेट डायरी असेल, तर त्यासाठीही भक्कम पासवर्डची गरज आहेच.

पासवर्डवरुन लक्षात आलं, मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा.

बाकी आता जास्त वेळ न घालवता आपण पासवर्ड तयार करणार्‍या वेबसाईट्सची माहीती घेऊयात.

१. passwordbird.com :
पासवर्ड बर्ड ही वेबसाईट पासवर्ड तयार करण्यासाठी फारच उपयुक्त वेबसाईट आहे. आणि एखादा पासवर्ड तयार करत असताना तुम्ही जरुर या वेबसाईटची मदत घ्यावी असं मला वाटतं. तिथे तुम्ही एखादं आवडीचं नाव, आवडीचा शब्द, आवडती तारीख देऊन Creat Password! वर क्लिक करता, आणि क्षणात तुमच्यासमोर तुमचा नवीन पासवर्ड हजर होतो, जो लक्षात ठेवण्यासही सोपा जाईल.

२. strongpasswordgenerator.com :
ही आणखी एक वेबसाईट आहे जी तुम्हाला याकामात मदत करु शकेल. इथे तुम्ही तुमच्या पासवर्डची लेंथ निवडता आणि Generate Password क्लिक करुन स्ट्रॉंग असा भरभक्कम पासवर्ड आपल्यासाठी तयार करुन घेता. या वेबसाईटचा उपयोग करुन तयार झालेल्या पासवर्डमध्ये कॅरॅक्टर्सचाही समावेश असेल.

३. goodpassword.com :
हा ‘बाईट्स इंटरऍक्टिव्ह’चा पासवर्ड जनरेटर आहे. हाही एक चांगला पासवर्ड जनरेटर आहे. इथे Random Password आणि Leet Password अशा दोन प्रकारात तुम्ही Password Generate करु शकता. प्रत्याक्षात त्या तिथे जाऊन ही साईट वापरुन पहा.

असेच आणखी काही पासवर्ड जनरेटर आहेत, त्यांची सलग यादी खाली देत आहे. तुम्ही जेंव्हा प्रत्यक्षात त्या वेबसाईट्सवर जाल, तेंव्हा तिथे काय करायचं आहे? ते तुम्हाला समजून येईलच!

४. freepasswordgenerator.com
५. maord.com
६. csgnetwork.com/passwordgen.html

आपले प्रोफाईल चित्र तयार करा


आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरील कोणत्या ना कोणत्या सोशल नेटवर्किंग कम्युनिटीत सहभागी झालेली आहे. एखादी सोशल नेटवर्किंग वेबसाईट जॉईन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपली खरी-खोटी माहिती भरु लागतो, मग शेवटी वेळ येते ती आपल्या प्रोफाईलसाठी एक छानसा फोटो निवडण्याची! बराच शोध घेतल्यानंतर आपण आपला सुंदरसा फोटो निवडतो. आणि जर कोणताच चांगला वाटत नसेल, तर मग ठिकठाक अशा फोटोवर काम चालून जातं. ( म्हणजे मी हे सारं त्यांच्याबद्दलच सांगतोय, जे आपला खरा फोटो निवडतात. :-) पण ब-याचदा असं घडतं की, आपला स्वतःचा किंवा दुसरा कोणताही एखादा फोटो आपल्याला पसंत तर पडतो, पण तो ‘त्या’ आकाराचा नसतो, ज्या आकाराची त्या वेबसाईटवर गरज आहे. अशावेळी mypictr ही वेबसाईट आपल्याला मदत करु शकते.

आपले प्रोफाईल चित्र तयार करा
mypictr.com वर तुम्ही तुमच्या संगणावरील फोटो Browse करुन त्यापॆकी एकाची निवड करता, त्यानंतर तो फोटो तुम्हाला कोणत्या वेबसाईटसाठी हवा आहे ते समोरच असलेल्या यादीमधून निवडता किंवा त्या फोटोची लांबी आणि उंची तुम्ही स्वतःच ठरवता आणि मग डाऊनलोड करुन घेता. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ठरावीक आकाराचा बॅनर तयार करायचा असेल, तर अशावेळी देखील तुम्हाला या वेबसाईटचा उपयोग होऊ शकतो. या वेबसाईटचा कसा उपयोग करुन घ्यायचा!? ते सारं काही तुमच्यावर अवलंबून आहे.

डाऊनलोड ऑनलाईन व्हिडिओ


एखादा ऑनलाईन व्हिडिओ आपल्याला आवडतो, तो आपल्याला आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्यायचा असातो, ...पण ज्या साईटवर तुम्ही तो ऑनलाईन व्हिडिओ पहात आहात, ती साईट तुम्हाला प्रत्यक्षात तसं करु देत नाही. अशावेळी मग दुसर्‍याच एखाद्या वेबसाईटची मदत घ्यावी लागते. ...आणि आपल्यासाठी तशी सोय उपलब्ध करुन देणार्‍या वेबसाईट्सही अनेक आहेत. मागे खूप दिवसांपूर्वी ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ च्या सहाय्याने ऑनलाईन व्हिडिओ कसा डाऊनलोड करायचा!? ते आपण पाहिलं होतं. तो लेख पूर्णपणे त्या विषयावर बेतलेला नव्हता, पण आज आपण पाहणार आहोत ते एका वेबसाईटचा उपयोग करुन आपल्याला यु ट्युब किंवा इतर ठिकाणचे ऑनलाईन व्हिडिओज्‌ कसे डाऊनलोड करुन घेता येतील!?

१. त्यासाठी प्रथम savevid.com या वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल.
२. त्या तिथे url असं लिहून त्यासमोर एक मोकळा बॉक्स दिला आहे, त्यात तुम्ही पहात असलेल्या ऑनलाईन व्हिडिओचे url टाका.

डाऊनलोड ऑनलाईन व्हिडिओ
३. आणि मग त्या बॉक्स समोरच DOWNLOAD असं लिहिलेलं जे बटण आहे, त्यावर क्लिक करा.
४. त्यानंतर प्रत्यक्षात तो व्हिडिओ तुमच्या संगणकावर डाऊनलोड करुन घेता यावा यासाठी, त्या बॉक्सच्या खाली, Download flv, Download mp4 आणि Download HD असे तीन पर्याय हजर होतील. त्यापॆकी कोणत्याही पर्यायाची निवड करा.
५. आणि आता तो व्हिडिओ संगणकावर डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला जर त्याचा फॉरमॅट बदलायचा असेल, तर ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ चा वापर करा.

अशाप्रकारे कोणताही ऑनलाईन व्हिडिओ तुम्ही आपल्या संगणकावर डाऊनलोड करु शकता, शिवाय त्याचा फॉरमॅट देखील चेंज करु शकता.

मोफत ऑनलाईन mp3 कटर


मागे एकदा मी माझ्या मोबाईलसाठी रिंगटोन मेकर सॉफ्टवेअर विकत घेतलं होतं. मी स्वतः विकत घेतलेल्या सॉफ्टवेअर्समध्ये ते एकमेवच म्हणावं लागेल! पण त्यालाही बरेच लिमिटेशन्स होते. म्हणजे ठरावीक bitrate ची mp3 फाईलच रिंगटोन तयार करण्यासाठी, त्या रिंगटोन मेकर मध्ये चालत होती. त्यामुळे बर्‍याचदा मला हव्या त्या गाण्याची रिंगटोन तयारच करता येत नव्हती. शेवटी ते एक मोबाईल सॉफ्टवेअर होतं...

आज आपण पाहणार आहोत, एकाद्या mp3 गाण्याचा हवा असलेला भाग कट कसा करायचा? तेही ऑनलाईन! मीही आत्ता इथे सांगता सांगता तुमच्या बरोबरच हा प्रयोग करुन पाहणार आहे.

१. सर्वप्रथम आपल्याला http://cutmp3.net/ या वेबसाईटवर जावं लागेल.
२. थोडावेळ थांबल्यानंतर Open MP3 हे बटण दिसेल, या बटणावर क्लिक करुन मी एक गाणं माझ्या संगणकारुन या वेबसाईटवर घेतलं आहे.
३. Play वर क्लिक केल्यानंतर मी निवडलेलं गाणं वाजायला सुरुवात झाली आहे.
४. माझ्या संगणकाच्या mp3 प्लेअरमध्येही तेच गाणं लावून त्या गाण्यातला माझा आवडता भाग किती मिनिट सेकंदांपासून ते किती मिनिट सेकंदांपर्यंत आहे, हे मी लक्षात ठेवलं आहे.

एम.पी.३
५. आता स्टेप ३ मध्ये मी जिथे ऑनलाईन Play वर क्लिक केलं होतं, तिथेच Pause वर क्लिक करत आहे.
६. Pause केल्यानंतर Splitted File Size च्या खाली मी स्टेप ४ मध्ये लक्षात ठेवलेली वेळ टाकली आणि Cut वर क्लिक केलं. (आधी हवी ती वेळ टाकायची आणि मग 00 (शून्य) काढून टाकायचे.)
७. mp3 मधून हवा असलेला भाग कट झालेली फाईल माझ्या संगणकावर मी सेव्ह केली.

आत्ता जवळपास कुठेतरी मोठ्या डॉल्बीवरुन जबरदस्त बिट्स ऎकू येत आहे. 

गुगलचा मोफत व्हिडिओ चॅट


दोन-तीन दिवसांपूर्वीच घरात वाय-फाय ची सुविधा सुरु केली. तेंव्हापासून घरातली इंटरनेटसाठी चालणारी वन वे ट्रॅफिक आता टु वे झाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच ‘नेटबुक’ घेतलेले, पण इंटरनेटशिवाय त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. मग यावर एक उत्तम उपाय म्हणून वाय-फाय सुरु केले!

तर अशाप्रकारे घरात वाय-फाय आल्यानंतर पर्वा दिवशी रात्री नेटबुकवर ऑर्कुट ओपन केले, तर त्या तिथे ‘चॅट विंडोत’ एक मित्र ऑनलाईन सापडला! त्याच्या स्टेटस पुढे हिरव्या रंगात व्हिडिओ कॅमेरा दिसत होता! मी त्याला विचारलं ‘व्हिडिओ चॅट करत आहेस का!?’ तो ‘नाही’ म्हणाला आणि मला व्हिडिओ चॅटचे invitation सेंड केले. ते मी accept करायला गेलो आणि मग एका वेगळ्याच पानावर जाऊन बसलो. त्या पानावरुन मला एक लहानसे प्लग इन इंन्स्टॉल करावे लागले! आणि मग आमचा व्हिडिओ चॅट सुरु झाला.

मला इतके दिवस वाटत होतं की, व्हिडिओ चॅट करणं आवघड आहे आणि त्यासाठी बरेच सेटिंग्ज करावे लागतात! पण तसं काहीही नाहीये. तुम्ही आपल्या मित्राशी ऑर्कुट वरुन, जीमेल वरुन अगदी सहज व्हिडिओ चॅट करु शकता.

१. तुमच्या संगणकाला ‘वेब कॅम’ जोडलेला असणं यासाठी आवश्यक आहे. लॅपटॉप असेल तर लॅपटॉपचा वापर करा. याशिवाय बोलण्यासाठी हेडफोन्स लागतील.
२. त्यानंतर या इथे एक छोटेसे प्लग इन मिळेल, ते आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन घ्या. जास्तितजास्त पाच मिनिटं लागतील. इंन्स्टॉलेशन पूर्ण होईपर्यंत धिर धरा. उगाच संगणकावर इकडेतिकडे टिचक्या मारत बसू नका.
३. इंन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर ‘तुमचा वेब ब्राऊजर रिस्टार्ट करु का!?’ अशा अर्थाची विंडो ओपन होईल. तेंव्हा आपला वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा. किंवा ती विंडो घालवा आणि मग स्वतःच वेब ब्राऊजर बंद करुन पुन्हा सुरु करा.
४. आतापर्यंत ज्या पायर्‍या तुम्ही पूर्ण करत आला आहात, त्या सर्व पायर्‍या, ‘ज्या मित्राशी तुम्हाला व्हिडिओ चॅट करायचा आहे’, त्याने देखील पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
५. तुम्ही गुगल व्हिडिओ चॅट ‘ऑर्कुट’ किंवा ‘जीमेल’ मधून करु शकता. खाली दिलेला व्हिडिओ पहा, त्याची तुम्हाला थोडीफार मदत होईल.



गुगल व्हिडिओ चॅट
६. ज्या मित्राशी आपल्याला बोलायचं आहे, त्याच्या नावावर क्लिक करुन त्याला चॅटसाठी निवडा. (अशावेळी आपला मित्र ऑनलाईन असणं आवश्यक आहे!). आपल्या चॅट विंडोच्या खालच्या बाजूला असलेल्या video and more या  पर्यायावर जाऊन video chat वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मित्राला तुमचा ‘व्हिडिओ कॉल’ येत असल्याचे समजेल. नेहमीच्या फोनची रिंग वाजते तशी त्याच्या संगणकावर रिंग ऎकू येईल. आणि सरतेशेवटी त्याने Answer वर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ कॉल सुरु होईल.
७. व्हिडिओ चॅटची क्लिऍरिटी चांगली आहे. फुल स्क्रिन करुन पहा. उजव्या बाजूला खाली एका छोट्य़ाशा विंडोत तुम्ही स्वतःला पाहू शकाल. आणि बाकीच्या संपूर्ण संगणक स्क्रिनवर तुम्हाला तुमचा मित्र दिसेल!
८. आता यासाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे? कोणते वेब ब्राऊजर वापरणं आवश्यक आहे? त्याची माहिती तुम्हाला या इथे मिळेल. पण शक्यतो आजच्या आधुनिक संगणकावर व्हिडिओ चॅट लगेच सुरु करता येईल. त्यामुळे requirements पहात बसण्याची फारशी गरज नाही. पण काही समस्या येत असेल, तर एकदा तपासून पहा.
९. आणखी मदत हवी असल्यास या लिंकवर जा.
१०. या ऑर्कुटच्या ब्लॉगवरही तुम्ही एक नजर फिरवू शकता.

व्हिडिओ चॅट करणं हे पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही संगणकाला इंटरनेट कनेक्शन जोडण्यासाठी काय खर्च केला असेल तितकंच! गुगल तुमच्याकडून यासाठी पॆसे घेणार नाही! खूप वेळ व्हिडिओ चॅट करायचा असेल, तर मात्र इंटरनेटचा ‘अनलिमिटेड डाटा प्लॅन’ असणं आवश्यक आहे.

व्हिडीओ चॅटची मजा काही ऒरच आहे! ज्यादिवशी मी पहिल्यांदा व्हिडिओ चॅट केला, त्यादिवशी मी खूप खुष होतो! अजूनही आहे... काही का असेना! पण २०१० साल आल्यापासून खर्‍या अर्थाने आधुनिक युगात, भविष्यात प्रवेश करत असल्यासारखं वाटत आहे!

Tuesday, 16 October 2012

आयफोनचा हॅकर फेसबुक मध्ये नोकरीला


वयाच्या अवघ्या १९-२० व्या वषीर् सोनी आणि आयफोनसारख्या मोठमोठ्या कंपन्यांच्या नाकी नऊ आणणारा हा हॅकर आहे जॉर्ज हॉट्झ. यावषीर् ९ मेपासून  फेसबुकमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला आहे. एवढंच नाही, तर अगदी दोन-तीन महिन्यांपूवीर् हॅकिंगमध्ये धन्यता मानणारा जॉर्ज फेसबुकमध्ये चांगलाच रुळलाय. त्यानं नुकतंच फेसबुकवर आपलं स्टेटस टाकलं, 'काम करण्यासाठी फेसबुक ही खरंच एक उत्तम जागा आहे. आता हॅकिंगची पहिली मोहीम तरी संपली आहे.

हॉट्झने २००८ मध्ये आयफोनचं सॉफ्टवेअर हॅक करण्यात यश मिळवलं. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर आयफोन अनलॉक कसा करायचा, हे त्याने बिनदिक्कत ब्लॉगवर टाकलं. पण त्याचं या क्षेत्रातलं सगळ्यात मोठं 'यश' म्हणजे त्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनीचा पीएस-३ साठीचा गुप्त 'सायनिंग इन' नंबर शोधून या बड्या कंपनीला तेवढाच मोठा धक्का दिला. हा नंबरही त्यानं सर्वांसाठी खुला केला.

अशाप्रकारे सिक्युरिटी कोड सर्वांसाठी खुला करणं हे कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन आणि कम्प्युटर फ्रॉड मानला जातो. याबाबत सोनीनं थेट कोर्टात केस दाखल केली. सोनीनं ही बाब इतक्या गंभीरपणे घेण्याला कारणही तसंच गंभीर होतं. हॉट्झने हॅक केलेल्या सिक्रेट कोड्सपैकी एक नंबर हा सगळ्या प्लेस्टेशन गेम्सचा की नंबर होता. या नंबरवरून त्या गेमची पात्रता आणि वैधता ठरते. त्यामुळे हा नंबर इतरांच्या हातात पडल्यास प्लेस्टेशनमधील गेम्सची पायरसी करणं खूपच सोप्प झालं. प्लेस्टेशन-३ गेले काही वर्षं कोणीच हॅक करू शकलं नव्हतं. पण गेल्या महिन्यात फेलओव्हरफ्लो नावाच्या एका हॅकिंग ग्रुपने, हॉट्सने लीक केलेल्या नंबरच्या आधारे प्लेस्टेशन-३ हॅक केलं. त्यांनी ही माहिती केऑस कम्युनिकेशन काँग्रेस या इंटरनॅशनल हॅकर्सच्या वाषिर्क बैठकीत बलिर्नमध्ये सादर केली. त्याचवेळी हॉट्झने यातला आपला सहभागही मान्य केला होता.

त्यानंतर मात्र सोनीने या ग्रुपमधील १०० जणांवर खटला दाखल केला. हॉट्झचाही यात समावेश होणं स्वाभाविक होतंच. त्यानंतर फेलओव्हरफ्लो ही साइट कायमची बंद झाली. पण या साइटतफेर् 'व्हिडिओगेम पायरसीला आम्ही कधीच पाठिंबा दिला नाही आणि देणारही नाही,' असं एक निवेदन सादर केलं गेलं.

आता मात्र या सगळ्या अध्यायातला मास्टरमाइंड जॉर्ज हॉट्झ हॅकिंगला तात्पुरता का होईना, अलविदा करून फेसबुकसारख्या क्रिएटिव्ह कंपनीत दाखल झाला आहे. त्यामुळे सोनी आणि आयफोनसारख्या मोठ्या कंपन्यांनी नक्कीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.


मायक्रोसॉफ्टचे नवे 'ऑफिस'


 
मायक्रोसॉफ्टने नुकतीच आपली नवी ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. या पाठोपाठ लगेजच मायक्रोसॉफ्ट लगेजच क्लाऊड कम्प्युटिंगवर आधारित आपले नवे 'ऑफिस 365' लॉन्च करत आहे. ऑपरेटिंग सिस्टिम आणि अफिस सोल्युशनमध्ये एकाधिकार शाही असलेली मायक्रोसॉफ्टने आत्तापर्यंत ऑफिसचे अनेक व्हर्जन्स बाजारात आणले आहे. यामध्ये ऑफिस 2007नंतर मायक्रोसॉफ्टने ऑपरेटिंग सिस्टिमवर लक्ष केंदित करत ऑफिस सोल्युशनकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र भविष्यातील तंत्रज्ञानाचा आढावा घेत मायक्रोसॉफ्टने तब्बल तीन वर्षांनी ऑफिस सोल्युशन बाजारात आणले आहे.

' ऑफिस 365' यामध्ये ऑफिसचे वेब अॅप्लिकेशन वापरता येणार आहे. हे लाइटवेट ऑनलाइन व्हर्जन असणार आहे. यामध्ये आपण र्वल्ड, एक्सेल आणि पॉवरपॉइंट याबरोबरच ऑनलाइन कम्युनिकेशनही करू शकतो. यासाठी मायक्रोसॉफ्टने या व्हर्जनमध्ये शेअर पॉइंट नावाची सुविधा दिली आहे. ही व्हर्जन क्लाऊड कम्प्युटिंगवर आधारित असल्याने यामध्ये आपण अनेक ऑनलाइन पॅकेजेस वापरू शकतो. यासाठी या व्हर्जनसोबत विविध मासिक योजनाही जाहीर होणार आहेत. लहान उद्योजकांसाठी ऑफिसचे विशेष वेब अॅप्लिेकशन तयार करण्यात आले आहे. हे अॅप्लिकेशन त्यांना ऑनलाइन उपलब्ध होऊ शकणार आहेत. याचबरोबर यामध्ये ई-मेल, वॉइसमेल, एन्टरप्राइजेस सोशल नेटवकिर्ंग, इन्स्टण्ट मेसेंजिंग, वेब पोर्टल्स, एक्स्ट्रानेटस, वॉइस आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही वापरता येऊ शकणार आहे. या व्हर्जनमध्ये जर निर्धारित किंमतीपेक्षा थोडे अधिक पैसे मोजले तर, हे व्हर्जन मोठ्या उद्योजकांनाही आकषिर्त करू शकणार आहे. यासाठी ऑफिस 'प्रोफेशनल प्लस'ची सोयही देण्यात आली आहे.

हे ऑफिस क्लाऊडवर आधारीत असल्यामुळे, यातील फाइल्स स्टोअर करण्यासाठी आपल्याला आपल्या हार्डडिस्कमधील जागा खर्च करावी लागणार नाही. यासाठी मायक्रोसॉफ्टचे ऑनलाइन 'डेटा अॅक्सेसेबल सेंटर' उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे व्हर्जन विशेषत: छोट्या उद्योजकांना समोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे, माक्रोसॉफ्टचे सीईओ स्टिव बोलमर यांनी स्पष्ट केले आहे. हे व्हर्जन र्व्हच्यअल असल्यामुळे याचा वापर आपण कम्प्युटरबरोबरच लॅपटॉप आणि मोबाइलमध्येही करू शकणार आहे. यामुळे छोट्या उद्योजकांना स्टोअरेजसाठी विशेष खर्च करावा लागणार नाही. भविष्यात सर्वत्र क्लाऊड कम्प्युटिंगचा वापर होणार आहे. यामुळे कंपन्यांचा खर्चात कमालीची कमी होणार आहे. विविध देशांमध्ये क्लाऊडचे सोल्युशन घेऊन अनेक कंपन्यांनी आपले तळ ठोकण्यास सुरूवात केली आहे. म्हणजे या कंपन्या मायक्रोसॉफ्टकडून एकदाच सर्व पैसे देऊन अधिकृत सॉफ्टवेअर्स विकत घेणार आणि त्यावर पैसे कमविणार यामुळे लंबी 'रेस का घोडा' असलेल्या मायक्रोसॉफ्टने मात्र या नव्या व्हर्जनच्या माध्यमातून क्लाऊड माकेर्टमध्ये उडी घेत प्रतिस्पधीर् कंपन्यांना चांगलाच चपराक बसविला आहे.

युट्यूब बॉक्स ऑफिस


इंटरनेटवर सिनेमा बघायचं म्हणजे प्रचंड कष्ट . एकतर २३ ते २४ भागांत तो सिनेमा एखाद्या वेबसाइटवर असतो . आपल्याकडे इंटरनेट कनेक्शनचा घोळ असल्यामुळे १५ मिनिटांचा एक व्हिडिओ बफर व्हायला किमान अर्धा तास लागतो . त्याशिवाय सगळे सिनेेमे एकाच ठिकाणी मिळतील याची सोय नाही . अशा सगळ्या परिस्थितीवर युट्यूबने मात्र भारीच तोडगा काढला आहे . युट्यूबने थेट ऑनलाइन बॉक्स ऑफिसच सुरू केलं आहे . ज्यामध्ये सध्याच्या घडीला २० सिनेमे ठेवले आहेत . विशेष म्हणजे हा बॉक्स ऑफिस विनामूल्य आहे .


व्हिडिओसाठी युट्यूब ही वेबसाइट प्रसिद्ध आहेच . सिनेमांमधले काही निवडक सीन्स या वेबसाइटवर नेहमीच बघितले जातात . त्यांना असणाऱ्या हिट्सची संख्याही मोठी आहे . भारतीय बाजारपेठेत यापूर्वी नेटफ्लिक्स आणि गुगलने सिनेमांसाठी विशेष तरतूद केली आहे . गुगलने मूव्ही रेण्टल सर्व्हिस सुरू केली आहे तर दुसरीकडे नेटफ्लिक्सही ऑनलाइन सिनेमामध्ये उतरण्यासाठी प्रयत्नशील आहे . अशा परिस्थितीत युट्यूबने मात्र थेट बॉक्स ऑफिस सुरू केल्यामुळे नेटिझन्समध्ये सकारात्मक वातावरण आहे .


आत्ताच्या घडीला या बॉक्स ऑफिसमध्ये दिल तो बच्चा है जी , धमाल , साथिया , परदेस , चुपके चुपके , पडोसन , गोलमाल , आनंद असे तब्बल २० सिनेमे टाकण्यात आले आहेत . थिएटरमध्ये सिनेमा दाखवताना अनेकदा काही सीन्स डिलीट करण्यात येतात . अनेकवेळा काही दृष्य दाखवली जात नाहीत . युट्यूब बॉक्स ऑफिसमध्ये मात्र डिलीटेड सीन्सही दाखवण्यात येणार आहेत . दीड हजारच्या वर सिनेमांचा कॅटलॉग युट्यूबतर्फे बनवण्यात येणार आहे . यामध्ये स्थानिक भाषांतले सिनेमेही दाखवण्यात येणार आहेत . त्यासाठी विविध प्रॉडक्शन कंपन्यांशी बोलणी करण्यात सध्या युट्यूबचे अधिकारी गुंतले आहेत .


बॉक्स ऑफिसची ही संकल्पना चांगली असली तरी भारतात इंटरनेट क्षेत्रात असणाऱ्या अडचणींचा विचारही युट्यूबला करावा लागेल असे नेटिझन्समध्ये बोललं जात आहे . यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असेल तो म्हणजे ब्रॉडबॅण्ड स्पीडचा . इंटरनेटचा स्पीड कमी असल्यामुळे बफरिंगमध्येच अधिक वेळ जातो . त्यामुळे तीन तासांचा सिनेमा बघताना नक्की किती वेळ कम्प्युटरसमोर बसावं लागेल याचा काही नेम नाही . म्हणूनच केवळ इंटरनेट कनेक्शनमुळे या चांगल्या संकल्पनेचे तीन तेरा वाजले नाहीत म्हणजे मिळवलं अशी चर्चा सध्या रंगली आहे. 

ऑनलाइन गोविंदा पथक

गोविंदा रे गोपाळाऽ ऽ ऽ असा गजर करीत गोविंदा पथक दादरला रानडे रोडवरील दहीहंडी फोडत असताना एक गोविंदा आपल्या लॅपटॉपवर जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून आता पुढे कुठे मोर्चा वळवायचा याची तयारी करीत असेल . दहिहंडीचे आयोजक , दहिहंडी पथके याचे फेसबुकवरील चॅटिंग कुठल्या हंड्या फुटल्या आणि कुठल्या फुटायच्या बाकी आहेत याची ताजी खबर सर्वदूर पोहोचवणार आहेत . गोविंदा पथके वेगवेगळी असली तरी , इंटरनेटच्या जाळ्याने त्यांचे विशाल पथक उभे राहून यंदा प्रथमच हाय टेक दहिहंडी नेटकऱ्यांना अनुभवायला मिळेल .

' हाय टेक ' गोविंदा पथकांना आणि आयोजकांना यंदा उत्सवाचे ' कम्प्लिट सोल्युशन ' देण्यासाठीhttp://www.dahikala.com/ नावाची एक वेबसाइट काही तरुणांनी सुरू केली आहे . जीपीएसपासून हेल्पलाइनपर्यंतच्या सर्व सुविधा देणारी ही वेबसाइट गोविंदा पथकांना आणि आयोजकांना एकमेकांशी ' कनेक्ट ' करणार आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर ही साइट सुरू करण्यात आली होती . मात्र यंदा ही साइट परिपूर्ण झाली असून येत्या १४ जुलैला लॉन्चिंग होणार आहे . या साइटवर जीपीएसच्या साह्याने मुंबईसह ठाण्यात कोणकोणत्या परिसरात किती रकमेच्या हंड्या लावण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती असेल . यातील एखाद्या ठिकाणावर आपण क्लिक केले की , तेथील आयोजकांच्या माहिती बरोबरच त्या परिसरातील हॉस्पिटल , ब्लड बँका , पोलीस स्टेशन आदी महत्त्वपूर्ण नंबर्स यादी मिळू शकणार आहेत .

साइटवर गोविंदा पथके आणि आयोजक आपले लॉगइन तयार करून आपले स्वत : च प्रोफाइल तयार करू शकणार आहेत . यावर पथके आणि आयोजक त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा देऊ शकणार आहेत . या प्रोफाइल्स माध्यमातून काही आयोजक विविध गोविंदा पथकांना ऑनलाइन निमंत्रणे पाठवू शकणार आहेत . याचबरोबर या साइटवर दहिहंडीच्या दिवशी जखमी होणाऱ्या गोविंदांची माहिती दिली जाणार असून त्याद्वारे त्यांना मदत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गोविंदा मंडळे आणि आयोजक आपल्या फेसबुकच्या लॉगइन आयडी आणि पासवर्डवरून या साइटवर मेंबर होऊ शकणार आहेत.

गुगलचा नवा 'स्कीमर'


एखाद्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती, त्याचे आयोजक, निमंत्रण वगैरेंसाठी वर्तमानपत्रं, मासिकं तसंच काही 'प्लॅनर' मासिकंही असतात. तशा प्रकारच्या वेबसाइट्सही जगभरात कार्यरत आहेत. यात आता गुगलने आणखी एक गुगली टाकत नवे वेब अॅप्लिकेशन बाजारात आणले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांसाठी 'स्कीमर डॉट कॉम' सोशल नेटवर्किंग साइट गुगलतर्फे सुरू करण्यात आली आहे. फेसबुकच्या 'इव्हेण्ट्स'प्रमाणेच स्कीमरमध्येही अॅक्टिव्हिटीज आणि इव्हेण्ट्सचा पर्याय असणार आहे. गुगलचे हे नवे स्कीमर अॅपिलकेशन रविवारपासून बाजारात उपलब्ध झाले आहे. 

आपण राहतो त्या ठिकाणी चालू दिवशी, आठवड्यात, महिन्यात किंवा नजीकच्या भविष्यात कोणकोणत्या घडामोडी होणार आहेत याविषयीची माहिती देण्यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे. गुगलने या नव्या उपक्रमाची अधिकृत घोषणा गुगल प्लसवर केली आहे. पण त्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या प्रकारासाठी ट्विटरवर रीतसर प्रमोशन केले जात आहे. स्कीमर सध्या प्राथमिक रूपात आहे. त्याशिवाय सुरूवातीला ऑर्कुट ज्याप्रमाणे 'इनव्हाइट ओन्ली' पद्धतीने काम करत होते तसेच ते या नव्या वेबसाइटसाठी असणार आहे. 

लोकेशन बेस्ड टेक्नॉलॉजीवर आधारीत हे अॅप्लिकेशन आपल्याला पाहिजे त्या शहरातील टीप्स आणि आपण तेथे जाऊन काय, काय करू शकतो याबाबत मार्गदर्शन करते. या अॅप्लिकेशनच्या मदतीने लोकांना कोणत्याही अनोळखी शहराची ओळख करून घेण्यास मदत होणार आहे. प्रत्यक्षात याची घोषणा गुगलने गुगल प्लस लॉन्च करण्यापूवीर्च केली होती. यासंदर्भात स्कीमर टीमने ट्विटरवरून भरपूर प्रसिद्धीही केली होती. या अॅप्लिकेशला विविध सोशल नेटवर्किंग साइट्स लिंक करण्यात आल्या आहेत. यामुळे आपण एखाद्या शहराचे नाव टाकले की आपल्याला त्या शहरातील आपल्या मित्रांची माहितीही समजते. याचबरोबर आपण तेथे जाऊन काय करणार आहोत याची टू डू लिस्टही आपण तयार करू शकतो. ही लिस्ट आपण आपल्या मित्रांशी शेअरही करू शकतो. यावर आपण फोटो, व्हिडीओजही यामध्ये शेअर करू शकतो. आपला विकेंड व्यवस्थित व्हावा यासाठीची ही नामी सुविधा असणार आहे. सध्या याचे बिटा व्हर्जन काम करत असून याचे पूर्ण व्हर्जन लवकरच बाजारात येणार आहे. सर्वप्रथम ही सुविधा अमेरिकेत सुरू होईल यानंतर टप्याटप्याने जगभरातील विविध देशांमध्ये सुरू होणार आहे. अर्थात तुम्ही यासाइटवर येण्यासाठी इन्व्हिटेशनची रिक्वेस्ट गुगलकडे पाठवून ठेऊ शकणार आहात. 

फेसबुक सांगणार ‘गोष्टी’


फेसबुक - सोशल नेटवर्किंगमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचल्यावर आता हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन काहीतरी देण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरूच आहेत . त्यामुळेच टाइमलाइन , फेसबुक अॅप्सनंतर आता कंपनीने facebookstories.com ही नवीन वेबसाइट लाँच केली आहे .

सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या , विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या , चटपटीत गोष्टी तुम्ही याठिकाणी शेअर करू शकता . ट्विटर स्टोरीज सारखंच हे दिसत असलं तरी ही ट्विटरची कॉपी नाही . नोव्हेंबर २०११ मध्ये ट्विटरने स्टोरीज लाँच केलं होतं . पण , त्यापूर्वीच जुलै २०१० मध्ये फेसबुकने स्टोरीज अॅप लॉँच केलं होतं . पण गेल्यावर्षी ट्विटर स्टोरीज लाँच होण्यापूर्वीच हे अॅप रद्द करण्यात आलं होतं .

फेसबुक स्टोरीजच्या वेबसाइटवर गेल्यावर होमपेजवर येथे पूर्वीपासून असलेल्या विविध स्टोरीज अतिशय आकर्षक स्वरुपात टॅब्युलर आयकॉन्समध्ये दिसतात . सध्या त्याठिकाणी मयंक शर्मा या नवी दिल्लीच्या तरुणाची स्टोरी दिसते आहे . या पेजवरील स्टोरी थेट वाचता / पाहता ( होय याठिकाणी व्हिडीओ , चित्रे अपलोड करण्याची सोय आहे ) येतात . तुम्हाला तुमची स्टोरी अॅड करायची असेल तर फेसबुक लॉग - इन चा उपयोग करावा. लॉग - इन आयडी , पासवर्ड टाकल्यावर स्टोरीज अॅप तुमच्या अकाऊंटमधील काही व्यक्तिगत माहिती वापरण्याची परवानगी मागते . ही परवानगी दिल्यावर तुम्ही स्टोरी अॅड करण्यास सज्ज होता . त्यात तुमची स्टोरी , कुठे घडली , कोणासोबत घडली हे विचारले जाते . त्यामुळे ही स्टोरी अॅड केल्यावर तुम्ही फोटो टॅग करता त्याप्रमाणे त्या मित्रांना स्टोरीसोबत टॅग करू शकता . यातच संबंधित व्हिडीओ किंवा फोटोही अॅड करता येतात . हे फोटो तुमच्या फेसबुक अकाऊंटमधील किंवा कम्प्युटरवरील असू शकतात . सध्या या स्टोरीजसाठी ' आठवण ' ही थीम आहे . दर महिन्याला ही थीम बदलत जाईल.

क्रोम - ऑपरेटिंग सिस्टिम


गुगलच्या 'क्रोम' ही ऑपरेटिंग सिस्टिम असलेले डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल, नोटबुक्स अर्थात 'क्रोमबुक' लवकरच बाजारात येणार आहेत. इंटरनेट जगतातील जाएंट गुगलने स्पधेर्ला तोंड देण्यासाठी आपल्या कक्षा रूंदावण्यास सुरूवात केली आहे. अगदी गृहपयोगी उपकरणांपासून ते आता नोटबुकपर्यंतचे माकेर्ट कॅप्चर करण्यासाठी गुगल सज्ज झाले आहे. 

लॅपटॉप बनविणाऱ्या कंपन्या वेगळ्या आणि त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम आणि सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या कंपन्या वेगळ्या यामुळे अनेकदा या कंपन्यांना एकमेकांना पैसे देऊन तर काही वेळेस विविध करार करून एकत्रितपणे काम करण्याची गरज भासते. परंतु, आता प्रत्यक कंपनी स्वतंत्र होऊ लागली आहे. आजपर्यंत इंटरनेट जगतात अडचण होती ती, ऑपरेटिंग सिस्टिमची. ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वर्षानुवषेर् स्वत:ची मक्तेदारी सिद्ध करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या विंडोजला आता अनेक पर्याय उभे ठाकले आहेत. यामध्ये युजर फ्रेण्डली ठरलेल्या गुगल 'क्रोम'ची सध्या माकेर्टमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. अर्थात गुगलने आता स्मार्टफोनच्या माकेर्टमध्ये आपले स्थान टिकविण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. त्यातच आणखी आक्रमक भूमिका घेत गुगलने आता 'क्रोम' ऑपरेटिंग सिस्टिम असलेले डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक अर्थात क्रोमबुक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांचे हे प्रोडक्ट बाजारात येणार असून यासाठी त्यांनी अॅसर आणि सॅमसंगशीही टायअप केले आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टिम असेलेले विविध प्रोडक्ट अमेरिकेत १५ जून पासून ऑनलादन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या नव्या क्रोम कम्प्युटर्समधून आपल्याला विविध प्रकारचे अॅप्लिकेशन्स वापरता येणार आहेत. यामध्ये आपण आपल्या गुगल अकाऊंटची सेटिंग करून ठेऊ शकतो. तर काही लिंक्स, फोन नंबरर्स, युट्युब वरचे काही व्हीडिओज आपल्या मोबाइलवर मॅपिंग करून ठेऊ शकतो. तुमच्या मोबाइलला प्रिंटींग केबल अटॅच केल्यानंतर त्यामधील मजकूराचा प्रिंट आऊटही तुम्ही घेऊ शकतात. तुमचे अनेक डिटेल्स तुम्ही तुमच्या क्रोम या ऑपरेटिंग सिस्टिमध्ये असेलेल्या ऑप्शन्समध्ये सेव्ह करून ठेऊ शकतात. ते सर्व डिटेल्स तुम्ही तुमच्या मोबाइलवरही पाहू शकता, अर्थात यासाठी तुमच्या कम्प्युटर आणि मोबाइलमध्ये 'क्राम' असणे गरजेचे आहे. वेबसाइटवरील तुम्हाला आवडलेले कोणतेही संदर्भ तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकता व ते तुम्ही फावल्या वेळात वाचू शकता. मोबाइलप्रमाणेच तुमच्या कम्प्युटरवरही तुम्हाला मेसेजेस टाइप करता येतील, तसेच आलेले मेसेजेस वाचताही येतील. परंतु, हे सर्व एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला 'क्राम'मय व्हावे लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि मोबाइल या दोन्ही गोष्टींमध्ये 'क्रोम' ही ऑपरेटिंग सिस्टिम असणे गरजेचे आहे.