Tuesday, 8 January 2013

वेब ब्राऊजर मध्ये कामाची नोंद ठेवा, काम लक्षात ठेवा, रिमाईंडर फॉक्स

नेटवर काम करत असताना मध्येच एखादी गोष्ट माझ्या लक्षात येते, पण हातातलं काम टाकून त्या गोष्टीकडे लक्ष पुरवणं त्यावेळी शक्य होत नाही. अशावेळी एक भिती असते की, कामाच्या राड्यात मग ते काम थोड्या वेळाने विसरुन तर जाणार नाही!? काहीतरी कारायचं होतं हे लक्षात राहिल, पण काय करायचं होतं? हे मात्र लक्षात राहणार नाही. असं अनेकवेळा होतं. बर्‍याचदा ते काम अगदी महत्त्वाचं देखिल असतं. अधूनमधून असं काम असल्याचं मनाला सांगत राहिनं, हा एक उपाय होऊ शकतो, पण तंत्रज्ञानाशी जवळीक साधत असताना त्यापासून दूर राहून कसं चालेल? पुढच्या वेळी नेटवर काम करत असताना एखादं काम लक्षात आलं, तर मी ते Reminder Fox या मोझिला फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन ध्ये वेळ देऊन साठवून ठेवेन. आणि मग ती वेळ येताच ‘रिमाईंडर फॉक्स’ (Reminder Fox) मला त्या कामाची आठवण करुन देईल. त्यामुळे मला माझ्या आत्ताच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल आणि या भितीनिशी वावरावं लागणार नाही की, या कामाच्या गडबडीत मी भविष्यातलं काम विसरेण!

आपल्या मोझिला फायरफॉक्स इंटरनेट वेब ब्राऊजरसाठी आपण ‘रिमाईंडर फॉक्स’ हे अ‍ॅड-ऑन या इथून इन्स्टॉल करु शकाल. या अ‍ॅड-ऑनचे वैशिष्ट्य म्हणजे यात आपण लक्षात ठेवायची आहे, अशी गोष्ट नोंद करुन ठेवू शकतो आणि मग हे अ‍ॅड-ऑन आपण सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी आपल्याला त्याची आठवण करुन देत राहिल. एकदा इन्स्टॉल केल्यानंतर हे अ‍ॅड-ऑन आपल्याला मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजरच्या तळाशी असलेल्या बारमध्ये उजव्या बाजूस दिसू लागेल. तिथे आपण आपल्या कामाची आणि वेळेची गणितं मांडू शकतो.

‘रिमाईंडर फॉक्स’ या मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड-ऑन मध्ये कामाची नोंद करुन ते लक्षात ठेवणे

१. आपल्या वेब ब्राऊजर मध्ये आपण रिमाईंडर फॉक्स हे अ‍ॅड-ऑन इन्स्टॉल केलेलं असेल.
२. उजव्या बाजूला तळाशी असलेला रिमाईंडर फॉक्स उघडा आणि Add Reminder या बटणावर क्लिक करा.
३. इथे आपणास लक्षात ठेवायचे आहे, अशा कामाची नोंद करा आणि ते काम कधी सुरु होऊन कधी संपणार आहे?, ते सांगा.
४. हे रिमाईंडर संपूर्ण दिवस चालू रहावे का? किती मिनिटांनी तो उघडला जाऊन त्याने आपल्याला आठवण करुन द्यावी? हे ठरवा आणि शेवटी ok वर क्लिक करा.
५. पुढच्या वेळी मोझिला फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडताच आपण नमूद केल्याप्रमाणे तो आपल्याला आपल्या कामाची आठवण करुन देत राहिल.

रिमाईंडर फॉक्सची काही छायाचित्रे:
रिमाईंडर फॉक्स आपल्या वेब ब्राऊजर मध्ये
रिमाईंडर फॉक्स मध्ये लक्षात ठेवायचे काम नमूद करताना
रिमाईंडर फॉक्स मध्ये लक्षात ठेवण्यासाठी नमूद केलेली कामं
पूर्ण केलेली आणि अपूर्ण अशी कामे
रिमाईंडर फॉक्स बाबतची साधने
यानंतर आपण नेटवर काम करत असताना आपल्या मनात जर एखादे काम आले आणि आपल्याला ते नंतर विसरुन जायचे नसेल, तर ते न विसरता रिमाईंड फॉक्स मध्ये नोंद करुन ठेवा.

Thursday, 1 November 2012

गुगल सर्च शॉर्टकट वापरा


गुगल सर्चचा आपण नेहमीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे उपयोग करु शकतो. त्यासाठी काही शॉर्टकट्स आहेत, त्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल.

उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, समजा तुम्हाला पुणे शहराचं हवामान पाहायचं असेल, तर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाईप करु शकता weather pune आणि लगेच तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे पुण्याचं हवामान दिसून येइल.

हवामान
आता समजा तुम्हाला एखाद्या शहराची वेळ पहायची असेल, तर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये टाईप करु शकता, time (आणि शहराचं नाव) उदा. time pune. आता खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पुण्याची वेळ दिसून येईल. 
वेळ
आणि आता एखाद्या शहराचा नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही टाईप करु शकता (शहराचं नाव) map. उदा. सर्च बॉक्स मध्ये pune map टाईप करुन पहा.
नकाशा
एखाद्या खेळाचा स्कोअर जाणून घ्यायचा असेल तर... उदा. score cricket
स्कोअर
एखाद्या शहराची लोकसंख्या जाणून घ्यायची असेल तर!? उदा . असं टाईप करा population mumbai
लोकसंख्या
एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या जाणून घ्यायची असेल तर काय कराल!? सर्च बॉक्स मध्ये define: (शब्द) असं टाईप करा. उदा. define: movie. खाली देलेले चित्र मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा.
movie चा अर्थ, व्याख्या
गुगल सर्च इंजन च्या बाबतीत आपण अशा भरपूर शॉर्टकट्सचा उपयोग करुन घेऊ शकतो.
या लिंकवर तुम्हाला आणखी काही शॉर्टकट्स बाबत माहिती मिळेल.
ही एक आणि दोन अशा आणखी काही लिंक्स देत आहे, ज्या तुम्हाला मदत करतील.


एक परिपूर्ण मोफत मराठी वेबसाईट


संगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने आपण अशा अनेक चांगल्या चांगल्या वेबसाईट्सना भेट देऊ शकतो, ज्या आपलं मनोरंजन करण्याबरोबरच आपल्या ज्ञानातही भर टाकतात. पण अनेकदा अशा वेबसाईट्स इंग्रजी भाषेत असतात आणि मग कितीही म्हटलं तरी आपल्या मातृभाषेची सर अशा इंग्रजी वेबसाईटला येऊ शकत नाही. जेंव्हा आपण आपल्या माय मराठी भाषेत असलेली वेबसाईट पाहतो, तेंव्हा नक्कीच ती आपल्याला अधिक जवळजी वाटते!

इंटरनेटवर सध्या मराठी वेबसाईट्सचे प्रमाण इंग्रजीच्या मानाने खूपच कमी आहे आणि अशाच काही मोजक्या निवडक चांगल्या मराठी वेबसाईट्समध्ये समावेश होतो तो ‘महाराष्ट्र माझा’ या वेबसाईटचा! maharashtramajha.com अशा एका सरळ सोप्या डोमेन नेम पत्त्यावर ‘महाराष्ट्र माझा’ ही वेबसाईट चालवली जाते. काय काय आहे या वेबसाईटवर!? त्यासाठी जरा या वेबसाईटच्या मेनूबारवरच एक नजर फिरवूयात! ब्लॉगर्स पार्क, सेलेब्रिटी, संस्कृती, राजकारण, Tech, पाककृती, मनोरंजन, आरोग्य, महाराष्ट्र, करिअर, कविता अशा अगदी चौफेर विषयांना ‘महाराष्ट्र माझा’ ही वेबसाईट स्पर्श करते.

मराठी वेबसाईट - महाराष्ट्र माझा
अगदी सुटसुटीत आणि आकर्षक असं रुप, स्वरुप या वेबसाईटला देण्यात आलं आहे. प्रत्येक विषयाच्या स्वरुपानुसार लेखांची वर्गवारी केल्याचं आपल्याला ‘महाराष्ट्र माझा’ या वेबसाईटवर दिसून येईल. जर तुम्ही स्वतः कवी, लेखक असाल आणि तुमच्या भावना सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी तुमच्याकडे सशक्त असे माध्यम नसेल, तर अशावेळी तुम्ही ‘महाराष्ट्र माझा’ या वेबसाईटकडे आपला लेख पाठवू शकता. असं केल्याने तुम्ही अगदी कमी वेळात जगभरातील मराठी रसिकांपर्यंत पोहचू शकणार आहात.

‘महाराष्ट्र माझा’ वर Tech या विभागाची इंटरनेट, कंम्प्युटर आणि मोबाईल अशा तीन विभागात व्यवस्थित विभागणी करण्यात आली आहे. ‘आपल्या मृत्यू नंतर ईमेल्सचे काय?’, ‘गुगलचे नवे ऑनलाईन न्यूज रिडर’, ‘ट्विटर म्हणजे काय?’, ‘आपला पासवर्ड सुरक्षीत कसा ठेवाल?’ इ. अनेक मनोरंजक, पण त्यासोबतच रोमांचक विषय साध्या सोप्या मराठी भाषेत उलगडण्यात आले आहेत. फक्त Tech या विषयाबाबतच नाही, तर इतर विषयांवरही अनेक लेख या वेबसाईटवर आहेत, ज्यातून आपल्या ज्ञानात भर पडणार आहे! जसं ‘उपवासातून आरोग्य’, ‘तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?’, ‘दिपावली’, ‘सर्वधर्म ‘सण’भाव’, ‘सुविचार’, ‘मोहमाया झाली वेडी’, शिक्षक दिना निमित्त’  इ. इ. ...आणि म्हणूनच मला सांगावंसं वाटतं की, आपला ई-मेल पत्ता देऊन ‘महाराष्ट्र माझा’ चे आर्टिकल्स जरुर सब्स्क्राईब करा!

‘महाराष्ट्र माझा’ चे मालक ‘आशिष कुलकर्णी’ यांची १७ जानेवरी २०१० रोजी ई-सकाळ साठी घेण्यात आलेली छोटिशी मुलाखत खाली देत आहे. ते आपल्या ब्लॉगमागची, वेबसाईटमागची भुमिका थोडक्यात सांगताना दिसून येतील. व्हिडिओत दाखवण्यात येत असलेले प्रसंग ‘मराठी ब्लॉगर्स मेळाव्याच्या’  निमित्ताने चित्रित केले गेले आहेत.


 


R

Friday, 19 October 2012

ऑनलाईन मोबाईल रिचार्ज


तुम्ही ज्या कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरत आहात, त्याच कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर सहजतेने तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करता येत असेल, तर ही गोष्ट खूपच छान आहे. पण जर तसं करणं शक्य नसेल... उदा. तुमच्या विशिष्ट बॅंकेचे ऑनलाईन आकाऊंट ते स्विकारत नाहीत... इ.इ. तर त्यासाठी तुम्हाला rechargeitnow.com ही वेबसाईट वापरता येईल. ccavenue चे मर्चंट अकाऊंट ते वापरत असल्याने, भारतातील अगदी कोणत्याही बॅंकेचे ऑनलाईन बॅंकिंक, ए.टी.एम. कार्ड ते स्विकारतात. याशिवाय या वेबसाईटचा वापर करुन तुम्ही डिश टि.व्ही., टाटा स्काय, सन डायरेक्ट यांच्या ‘डायरेक्ट टु होम’ सेवा देखील रिचर्ज करु शकाल.


१. त्यासाठी आधी rechargeitnow.com या वेबसाईटवर रजिस्टर व्हा. साईन-इन करा.
२. mobile, DTH, TATA WALKY यापॆकी काय रिचार्ज करायचे आहे ते निवडा.
३. त्यानंतर ती सेवा पुरवणारा सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. ‘GO’ वर क्लिक करा.
४. त्यानंतर उघडल्या जाणा-या पानावर कितीचा रिचार्ज करायचा आहे ते सांगा. ‘Continue’ वर क्लिक करा.
५. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बॅंकिंग यापॆकी ज्याचा उपयोग तुम्ही पॆशे देण्यासाठी करणार आहात त्याची निवड करा. आणि बॅंकेचे नाव सांगा.
६. ‘टर्मस् आणि कंडिशन्स्’ ना चेक करा. ‘Buy Now’ वर क्लिक करा.
७. त्यानंतर तुमची माहिती असलेला फॉर्म उघडला जाईल. तिथे खाली परत एकदा ‘पेमेंट मोड’ सिलेक्ट करा आणी तो फॉर्म ‘सबमिट’ करा.
८. ‘नेट बॅंकिंक’ बाबत आपल्या बॅंक आकाऊंट मध्ये लॉग-इन व्हा.
९. तुम्हाला पावती दिसेल ती ‘confirm’ करा. छोट्या-मोठ्या ऒपचारिकता पूर्ण करा.
१०. त्यानंतर तुम्ही rechargeitnow वर परताल. तिथे तुमच्या बिलाची पावती असेल, ती तुम्ही प्रिंट करु शकाल.
११. तुमचा मोबाईल रिचार्ज झालेला असेल! साईन-आऊट व्हा.

* मला वाटतं असा ऑनलाईन रिचार्ज पहिल्यांदाच करत असाल, तर तो ५० रु. चाच करुन पहावा. त्यातून तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागतं ते समजेल. आणि पुढच्यावेळी रिचार्ज करताना रिचार्ज करायची अमाऊंट तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासाप्रमाणे ठरवावी :-) पण फार काळजी करु नये... ही साईट विश्वसनीय आहे. ऍलेक्सा रॅंकिंगमध्ये या वेबसाईटचा भारतीय क्रमांक १२३१ आहे. (ई-सकाळचा ५४९०). यावरुन भारतातील अनेक लोक आपला मोबाईल रिचार्ज करण्यासाठी rechargeitnow ही वेबसाईट वापरतात याबाबत खात्री असावी. तर मग पुढच्यावेळी तुमचा मोबाईल राचार्ज करायची वेळ आली असेल, पण तुमच्याकडे बाहेर जायला वेळ नसेल, अशावेळी ऑनलाईन रिचार्ज हा कदाचीत तुमच्यासमोरील सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.

मोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर


संपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता आला तर!? असं झालं तर जगाच्या पाठीवर तुम्ही कधीही हरवणार नाही. आणि वाटेतील अनोळखी रस्त्यांची तुम्हाला कधी भिती वाटणार नाही.
(सूचना - खाली रिकामी जागा दिसत आहे!? त्या तिथे एक व्हिडिओ आहे. तो दिसत नसेल तर, पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण स्वरुपात उघडावा.)

 


 

पुन्हा एकदा गुगलने यासाठी एक दर्जेदार सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच वापरायचं आहे. याचं नाव आहे ‘गुगल मॅप्स’.


१. ‘गुगल मॅप्स’ वापरण्याकरता तुमच्या मोबाईलवरुन m.google.co.in/maps या पत्त्यावर जा.
२. ‘गुगल मॅप्स’ आपल्या मोबाईलवर डाऊनलोड आणि इंस्टॉल करुन घा.
३. ‘गुगल मॅप्स’ ओपन केल्यानंतर मोबाईलवरील बटणांच्या सहाय्याने वापरावयाचे हे शॉर्टकट्स लक्षात ठेवा. ‘२’ या बटणाने ‘मॅप व्हू’ आणि ‘सॅटेलाईट व्हू’ यांदरम्यान स्विच होईल. ‘झुम इन’ साठी ३ नंबरचे बटण आणि ‘झुम आऊट’ साठी १ नंबर बटण वापरावे लागेल. ट्रॅफिक पाहण्यासाठी ७ नंबरचे बटण आणि एखादे लोकेशन फेव्हरेट म्हणून सेव्ह करण्यासाठी * बटणाचा वापर करता येईल. ‘गुगल मॅप्स’वर ‘डायरेक्शन’ पाहण्याची सोयही उपलब्ध आहे.

असंच शहरात फिरता फिरता एकदा रस्ता भटकल्यावर मी माझ्या मित्राला ‘गुगल मॅप्स’ बद्दल सांगितलं. आणि त्याला त्याच्या मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ इंस्टॉल करुन दिलं, तेंव्हा ते पाहून त्याला फारच आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. आम्ही दोघांनी मिळून लगेच आम्हाला जायचं होतं ते ठिकाण शोधून काढलं. शेवटी अंधळ्याला काठीचा आधार आणि बुडत्याला काडीचा आधार (हे या इथे जुळलं तर जुळवून घ्या नाहीतर सोडून द्या :-) अशाप्रकारे कधी बाहेर गावी, दुस-या राज्यात फिरायला गेल्यावर, जर तुम्ही रस्ता भटकलात, तर त्यावेळी आपल्या मोबाईलवर ‘गुगल मॅप्स’ ओपन करायला विसरु नका.

पासवर्ड तयार करा


आज आपण माहिती घेणार आहोत ती स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्याबाबत, म्हणजेच पासवर्ड जनरेटर, पासवर्ड क्रिएटर बाबत. बर्‍याचदा आपले पासवर्ड हे असे असतात जे आपल्याच आसपासच्या व्यक्तींपासून, गोष्टींपासून प्रेरणा घेऊन ठेवलेले असतात. अशावेळी ते तितकेसे भक्कम असत नाहीत. आपली ऑनलाईन प्रायव्हेट डायरी असेल, तर त्यासाठीही भक्कम पासवर्डची गरज आहेच.

पासवर्डवरुन लक्षात आलं, मध्ये माझ्या एका मित्राचे ‘गुगल अकाऊंट’ हॅक झाले होते. म्हणजे हॅकर्सनी अगदी हुबेहुब ऑर्कुट सारखं पेज तयार केलं होतं आणि तिथे जर तुम्ही लॉग-इन झालात की, संपलंच मग सगळं! पण यावेळीही गुगलच्या सोयीसुविधा त्याच्यासाठी धावून आल्या. म्हणजे त्याचं अकाऊंट हॅक जरुर झालं! पण त्याचं त्याला ते परतही मिळालं! कसं काय!? त्याने गुगल अकाऊंट्सला आपला मोबाईल नंबरही दिला होता. त्याने मोबाईलच्या सहाय्याने आपला पासवर्ड रिसेट करुन आपलं अकाऊंट परत मिळवलं. ऑनलाईन अकाऊंट आणि आपला मोबाईल नंबर हे दोन्ही एकाच वेळी चोरीला तर जाऊ शकत नाहीत ना! आणि म्हणूनच मला वाटतं, सावधानतेचा उपाय म्हणून प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर गुगलला देऊन ठेवावा.

बाकी आता जास्त वेळ न घालवता आपण पासवर्ड तयार करणार्‍या वेबसाईट्सची माहीती घेऊयात.

१. passwordbird.com :
पासवर्ड बर्ड ही वेबसाईट पासवर्ड तयार करण्यासाठी फारच उपयुक्त वेबसाईट आहे. आणि एखादा पासवर्ड तयार करत असताना तुम्ही जरुर या वेबसाईटची मदत घ्यावी असं मला वाटतं. तिथे तुम्ही एखादं आवडीचं नाव, आवडीचा शब्द, आवडती तारीख देऊन Creat Password! वर क्लिक करता, आणि क्षणात तुमच्यासमोर तुमचा नवीन पासवर्ड हजर होतो, जो लक्षात ठेवण्यासही सोपा जाईल.

२. strongpasswordgenerator.com :
ही आणखी एक वेबसाईट आहे जी तुम्हाला याकामात मदत करु शकेल. इथे तुम्ही तुमच्या पासवर्डची लेंथ निवडता आणि Generate Password क्लिक करुन स्ट्रॉंग असा भरभक्कम पासवर्ड आपल्यासाठी तयार करुन घेता. या वेबसाईटचा उपयोग करुन तयार झालेल्या पासवर्डमध्ये कॅरॅक्टर्सचाही समावेश असेल.

३. goodpassword.com :
हा ‘बाईट्स इंटरऍक्टिव्ह’चा पासवर्ड जनरेटर आहे. हाही एक चांगला पासवर्ड जनरेटर आहे. इथे Random Password आणि Leet Password अशा दोन प्रकारात तुम्ही Password Generate करु शकता. प्रत्याक्षात त्या तिथे जाऊन ही साईट वापरुन पहा.

असेच आणखी काही पासवर्ड जनरेटर आहेत, त्यांची सलग यादी खाली देत आहे. तुम्ही जेंव्हा प्रत्यक्षात त्या वेबसाईट्सवर जाल, तेंव्हा तिथे काय करायचं आहे? ते तुम्हाला समजून येईलच!

४. freepasswordgenerator.com
५. maord.com
६. csgnetwork.com/passwordgen.html

आपले प्रोफाईल चित्र तयार करा


आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरील कोणत्या ना कोणत्या सोशल नेटवर्किंग कम्युनिटीत सहभागी झालेली आहे. एखादी सोशल नेटवर्किंग वेबसाईट जॉईन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपली खरी-खोटी माहिती भरु लागतो, मग शेवटी वेळ येते ती आपल्या प्रोफाईलसाठी एक छानसा फोटो निवडण्याची! बराच शोध घेतल्यानंतर आपण आपला सुंदरसा फोटो निवडतो. आणि जर कोणताच चांगला वाटत नसेल, तर मग ठिकठाक अशा फोटोवर काम चालून जातं. ( म्हणजे मी हे सारं त्यांच्याबद्दलच सांगतोय, जे आपला खरा फोटो निवडतात. :-) पण ब-याचदा असं घडतं की, आपला स्वतःचा किंवा दुसरा कोणताही एखादा फोटो आपल्याला पसंत तर पडतो, पण तो ‘त्या’ आकाराचा नसतो, ज्या आकाराची त्या वेबसाईटवर गरज आहे. अशावेळी mypictr ही वेबसाईट आपल्याला मदत करु शकते.

आपले प्रोफाईल चित्र तयार करा
mypictr.com वर तुम्ही तुमच्या संगणावरील फोटो Browse करुन त्यापॆकी एकाची निवड करता, त्यानंतर तो फोटो तुम्हाला कोणत्या वेबसाईटसाठी हवा आहे ते समोरच असलेल्या यादीमधून निवडता किंवा त्या फोटोची लांबी आणि उंची तुम्ही स्वतःच ठरवता आणि मग डाऊनलोड करुन घेता. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ठरावीक आकाराचा बॅनर तयार करायचा असेल, तर अशावेळी देखील तुम्हाला या वेबसाईटचा उपयोग होऊ शकतो. या वेबसाईटचा कसा उपयोग करुन घ्यायचा!? ते सारं काही तुमच्यावर अवलंबून आहे.